अंतरीचे तरंग

'उत्पत्ती-स्थिति-लय' यही सत्य है। विश्व का एक भी क्षेत्र इसे परे नही है।

Monday, 11 December 2017

घडलो’बि’घडलो-२


किमान वर्षभरानं माहेरच्या मातीत पाय टेकवला होता. इकडे यावंस वाटत नाही असं नव्हे, पण कामाच्या व्यापात राहून जातं. अलिकडं फोनची सोय झाल्यानं प्रत्यक्ष भेट लांबली तरी बोलता येतं, एवढंच समाधान. म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवायची. 
बऱ्याच दिवसांनी आलो त्यामुळे मुलंही खूष होती. दुपार पर्यंत त्यांचा दंगा सुरूच होता, मात्र जेवणं झाली तशी कानाशी भूण भूण सुरू झाली, कंटाळा आला, आता काय करायचं. वेगवेगळे खेळ सुचवले पण यांचा कंटाळा कशातच विरघळेना, शेवटी दामटवून झोपवले. मात्र, साडेतीनलाच पुन्हा उठली. आता यांना गुंतवलेच पाहिजे म्हणून वहिनीला म्हटल,” भिलईला गाडी आत जाते का गं. “ वहिनी होय म्हणाली. मग ठरवलं तिकडेच जाऊया. कपिलेश्वराचं जुनं मंदिर आहे समोर मोकळं अंगण आहे. खेळतील आणि दमले की रात्री लवकर झोपतील. 
म्हणजे आम्ही सर्व मोठी मंडळी अंगणात निवांत गप्पा मारत बसू शकतो. 
तयारी करून निघालोच. वीस ते पंचवीस मिनिटांत पोहचलो. मंदिराचा कायापालट झाला होता. समोर छान सभामंडप होता. पाण्याची दोन कुंड बाधंलीयत, हातपाय धुऊन कपिलेश्वराच्या दर्शनासाठी मंदिरात गेलो.गाभाऱ्यातील जुनी शिवपिंडी आणि समोरचा नंदी मात्र  होतं तसंच आहे. शांतता तर अशी की सहज डोळे मिटले तरी ध्यान लागाव. काळ्याभोर पिंडीवर ताजी हिरवीगार बिल्वपत्र शोभून दिसत होती. गाभाऱ्यात खापराचा दिवा तेवत होता. बाहेर सभामंडपात लाईटची सोय केलेली आहे. पण गाभाऱ्यात या मिणमिणत्या दिव्याचं अखंड साम्राज्य! मुलं खेळण्यास पळाली होतीच. मंदिराच्या समोर छोटीसी नदी आहे. त्या पलिकडच्या किनाऱ्यावर स्मशानभूमी. बप्पा म्हणायचे हा शंम्भो संसारी माणसांना विसरू देत नाही, कितीही माझं माझं केलंत तरी शेवटी इथं एकट्यायालाच यायचंय.  म्हणून गावाच्या मध्यावरील मंदिरा समोरच स्मशानाला जागा... शेजारी असलेलं बप्पांच घर...बप्पा म्हणजे इथले पुजारी. बाप्पाचा अपभ्रंश बप्पा झालं असावं हा माझा तर्क. त्या घरात आजही  काही बदल नव्हताच. पूर्वी वारंवार यायचो त्यामुळे अनेकांशी ओळख होतीच. मुलं खेळण्यात रमली तशी मी आणि वहिनी बप्पांच्या घरी गेलो. त्यांच्या सुनेनं हसतमुखानं स्वागत केलं. ओसरीवर बसलो. तेवढ्यात शेजारचा विजय, म्हादू काका, सख्या, सुमन...एक ना अनेक . भेटायला आली, गप्पांचा फड रंगला. बप्पांची सून शुभांगी, तिलाही अवघा गाव वहिनीच म्हणतो. ती म्हणाली,एक दिवसाड तरी हे सर्व येणारच. सर्व काही तसंच सुरू आहे...बप्पा जाऊन सहा महिने झाले. तिनं डोळ्याला पदर लावला. सर्वांच्याच डोळ्यात पाणी तराळलं.
अशी कित्तेक मंडळी बप्पांनी हयातभर जपलेली. त्यांना चहा देणं रोजचंच. आमच्यासकट यांतील कुणीही आलं की चहा पिणार, हवापाण्याच्या गप्पा मारणार, काही अडचण असेल तर सल्ला मागणार, कुणाच्यात कुरबुरी असतील तर त्या दूर करणार, कुणी मदत मागितली तर देणार. शेतीचा बैल हवा दोनतीन दिवस, शेत नांगरायचंय  म्हणाला तरी देणार, कधी तिखट मिठ तर कधी काय...मागणाऱ्याला देत राहणार, संकोचानं न मागणाऱ्याच्या खांद्यावर हात टाकून आस्थेनं विचारपूस करणार, मग त्यालाही मदत...तर यातलेच काही जण अधूनमधून त्यांचा हात धरून त्यांना समोरच्या रस्त्यावर नेणार...बप्पांना हे सवयीचं होतं, मग लेंग्याच्या खिशात हात घालून ते त्यांच्या हातात काही टेकवून तेच मूठ वळायचे. ‘जा रे नीट जा...जास्त घेऊ नकोस.’ 
मग बप्पांची सावलीच असलेल्या राधाकाकू आतूनच ओरडणार... कशाला देता तो घेणार हातभट्टीची. पैसे वर आलेत का? आपलाही संसार आहे म्हटलं...त्यावर बप्पांच ठरलेलं वाक्य- “ माणूस आशेनं येतो, कुठे पंचपक्वान्न घालतोय, घोट भर चहा आणि पाच दहा रूपये. शम्भो देतोय आणि देईल. बप्पांना तासनतास पूजा करताना कधी पाहिलं नाही, मात्र मुखात सतत शम्भोचं नाव. त्यांची पाच मिनीटांत पूजा आटपायची. मात्र, माणसांवर प्रचंड प्रेम. माणसं जपली पाहिजेत, जिवंत माणसाच्या मुखी घाला हा जीवनमंत्र होता. मृत्यूनंतर लोकं गाव जेवण घालतात, काय उपयोग? माणूस जिवंत आहे तोवर त्याला सांभाळा, ही नकळत कृतीतून दिलेली शिकवण होती. राधाकाकू त्रागा करायची, पण तिच्याकडूनही दारात आलेला कधी रिकाम्या हाती गेलाच नाही...काही ना काही हातावर टेकवायचीच. पावसाळ्यात राधाक्काच्या हातचं लोणचं कित्तेक घरात पोहचायचं. भात लावायला शेतात येणारे मजूर भर पावसात उपाशी राहू नयेत म्हणून मागच्या ओसरीतल्या चुलीवर मोठ्या पातेल्यात भात रटरटायचा आणि कुळथाचं पिठलंही व्हायचं... 
तेव्हाही मंदिरातलं दर्शन आणि शेजारची हिरवाई आम्हाला आवडत होती, पण खरी ओढ होती बप्पांना भेटायची.  याच अंगणात बागडायचो. त्यांचे मदत करणारे हात पहायचो...मोठे झालो तसे प्रश्न पडायचे? हे सर्व कसं घडतं ? पैसे येतात कसे, कसं निभावतात हे सर्व...? “ पण हे कोडं उलगडलं तेव्हा गाव पार दूर सोडलं होतं, स्वत:चा संसार सुरू झाला, अनेक चढउताराच्या काळात बप्पांची आठवण सोबतीस यायची. 
पंचक्रोशी बप्पांचा शब्द मानायची ते त्यांच्या याच माणुसकीच्या धर्मामुळेच....शुभांगी वहिनी चहा घेऊन आल्या. बप्पांच्या आठवणी डोळ्यांसमोर फेर धरत होत्या, दोन महिन्याच्या अंतराने दोघेही गेले तेव्हा संपूर्ण गाव शेवटचा निरोप द्यायला लोटलेला...पुढे महिना भर आजूबाजूच्या गावातली माणसंही येतच होती....रडतही होती...माणसं हिच त्यांची श्रीमंती होती, एवढंच नव्हे तर श्वास होती...
आज आमची गाडी पाहिली  तशी ही ओळखीची जुनी मंडळी ओसरीवर आली...आस्थेनं विचारपूस केली. आता त्यांना आशा असते की नाही, माहीत नाही...पण -‘बेस रहा हौ...येतच रहा...’असं म्हणून हसत हसत निरोप घेऊन उठलेला म्हादूकाका चार पावलं पुढे गेला आणि मला बप्पांचे शब्द आठवले. मग म्हादू काका अशी हाक मारली पर्समधून  ५० रू. च काढले. कारण मला माहित आहे, आजही तो मोहाची किंवा काजूची हातभट्टीचीच घेणार आहे. तो ही सर्व जाणून हात पुढे करून तोंडाने नको नको म्हणत होता. पण डोळ्यातून कृतज्ञता वाहत होती...जुनी माणसं अशीच माणसं जोडत गेली. तेच पुढं सुरू राहिलं तर त्यातून आनंदच निर्माण होतो, हे मलाही अलिकडं पटलंय. अंधार वाढत होता , तसं दंगा करणाऱ्या मुलांना गाडीत घातलं. शुभांगी वहिनीचा साश्रू नयनांनी निरोप घेऊन बाहेर मुख्य रस्त्याला लागलो. सवयीनं गाडीचा ताबा इंद्रियांकडे  होता... मन मात्र भूतकाळातल्या सारीपाटावर रेंगाळलं होतं. 
- सुमेधा उपाध्ये
Posted by sumedha upadhye at 00:19 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

घडलो’बि’घडलो-१


 लहानपणी आम्ही सर्व भावंड आईसोबत कधी नातेवाईकांकडे तर कधी स्नेहींकडे जायचो. यातील अनेकजण आमच्या पेक्षा बऱ्यापैकी पैसे बाळगून होते, घरून निघतानाच आई सांगायची-“ बाळांनो, तिकडे कोणत्याही वस्तूला हात लावायचा नाही, काहीही मागायचं नाही, बदाम पिस्ते काजू हे सर्व खूप महाग असतं. ते सर्व पदार्थ सजवण्यासाठी वापरतात. पौष्टिकता तर आहेच...हं,  तर काय सांगतेय ऐकताय ना रे...! ती घराणं मोठी त्यांच्या मुलांनी हळूच ताटलीत हात घालून काही खाल्ले म्हणून तुम्ही हात घालाल, तसं करू नका. अरे, श्रीमंतांची गोष्ट वेगळी असते, त्यांनी काही खाल्लं तर आवडतं म्हणून खाल्लं असं म्हणतील, गरीबानं मात्र भूक लागली  म्हणून लपवून खाल्लं असं टोचत राहतील, नीट वागा हं.” आईची उदाहरणं, म्हणी लय भारी असायच्या, पण या संस्कारांमुळे घरा बाहेर कुठंही गेलो तर, पहिलं वाढलेलं तेवढंच खाण्याची सवयच जडली. कुणाकडेही कधीच न मागण्याच्या या सवयीमुळे त्याचे परिणाम जे व्हायचे ते होतातही. पण समाधान मोठं. 
मात्र, अशातही फक्त एक भूक कळत्या वयापासून कायम वाढत गेली, ती आवडीनं जोपासली, ती म्हणजे ज्ञानाची भूक. नवनवीन माहिती जाणून घ्यायची, प्रयत्न करायचे. कित्तेकदा त्यासाठी रद्दीतली पुस्तकं उचलून आणली, तर काहींची ओझीही वाहिली.दिवस पुढेपुढे सरकत गेले. 
काळ कुणासाठी थांबत नसतोच. आता घरोघरी एक किंवा दोन मुलं, त्यांच्या गरजा वेगवेगळ्या, अलिकडं मुलांचंही कुणाकडं जाणं येणं नाही.  ती आपल्या विश्वात जास्त रमतात. नाती असो वा स्नेही किंवा मैत्री सारंच कसं अलिकडं सोशल मिडियाच्या माध्यमतून जपलं जातं. घरात बदाम पिस्त्याच्या बरण्या ओसंडून वाहतात, ते संपवावे म्हणून त्याचे लाडू केले, तरी दोन दिवस बळेबळे खाल्ले जातात, मग आठच दिवसात ते घरा बाहेर पडतात...कधी कामकरणाऱ्या बाईच्या घरात, तर कधी कचरा घेऊन जाणाऱ्याच्या हातात...संदर्भ बदलले की नकळत होणाऱ्या संस्कारांचे मुल्यही बदलत जातं. आपण मात्र विचार करत राहतो...कमी पैशातही तेव्हा घरात सुख समाधान नांदत होतं, चेहऱ्यावर झळकत होतं. मागणं हे कमीपणाचं लक्षण होतं. आता संपूर्ण समाजाचीच जडण घडण बदलली. नात्यांचे बंध विरळ होत गेले अन् मागण्याचे संदर्भही बदलले!
- सुमेधा
Posted by sumedha upadhye at 00:17 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Thursday, 20 April 2017

मन वढाय वढाय-4 जनशक्तीमधील स्तंभ-

                                                  || देव मस्तकी धरावा| अवघा हलकल्लोळ करावा ||

    सर्व शक्तीमान असे जे या विश्वाच्या निर्मितीचे कारण आहे. जी दिव्य शक्ती, ज्याच्या कृपेने या जगात आलो, ज्याची अवघ्या चराचरावर सत्ता आहे. जो सर्वव्यापी आहे, आपण त्यालाच विसरत चाललोय का? कोणी घासभर तुकडा दिला तर आपण त्यांचे आभार मानतो, त्यांच्या समोर मान खाली घालून वारंवार कृतज्ञता व्यक्त करतो मग ज्याने जन्म दिला आणि लगेचच जीवाला वाढवण्यासाठी लागणारे सर्व काही मुक्त हस्ते देत राहिला त्यालाच नाकारू लागलोय. ज्याने अमर्याद पृथ्वी दिली, ज्याने असीम आकाश दिले, दशदिशा दिल्या, उन्ह-पाऊस दिलं, पिंके आणि शेती दिली, जो अविरत कृपाच बरसत राहिलाय आपण त्याचे अस्तित्वच मान्य करण्यासाठी कोतेपणा दाखवत आहोत का?

   विज्ञानवाद म्हणा वा आधुनिक जग म्हणा इथं आपण सर्व सत्वहीन आणि टाकाऊ गोष्टींना प्रथम स्थान देऊन स्वत:च्या प्रगतीच्या आड उभे रहात आहोत. जसं नव्या उत्पादनाची सतत जाहिरात करून तीच कशी फायदेशीर आहे, हे मनावर बिंबवले जाते. व्यापक प्रमाणात जे समोर येते तेच खरे मानून त्याच्या खरेदीसाठी झुंबड होते. लोक भावनेचा अभ्यास आणि मार्केटिंगचे नवे फंडे त्या त्या उत्पादनाच्या अधिक खपासाठी वापरले जातात. मग त्याच्या उपयोगितेवर आणि टिकाऊ मुल्यांवर प्रश्नच उठवले जात नाहीत. जेव्हा त्यातील फोलपणा उघड होतो तेव्हा बराचकाळ गेलेला असतो. कमी अधिक फरकाने आपणही अनेकदा जिनवातील अत्यंत आवश्यक गोष्टींची अवहेलना करतोय, कारण जे समोर दिसत नाही पण जे आहे, ते नाकारतो. याचं एक कारण आज समाजात चांगल्या गोष्टी शिकवल्याच जात नाही हे असावे. चांगले विचार हवे असतात, पण स्वार्थाची सरमिसळ झाल्यानं सर्वव्यापी हिताची व्याख्याच नष्ट होत आहे. केवळ ‘स्व’ मध्येच गुंतल्यानं अनेक प्रश्न निर्माण होताहेत. या विश्वाचाच एक भाग होऊन उभे राहून कार्य करणारी एक शक्ती आहे, जी रहस्यमय आहे. तिचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे तिच्या जवळ जाण्याची आस असणे, त्यावर विश्वास ठेवूनच, मार्ग कोणताही स्वीकारा पण तिला शरण जाऊन तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करूनच ते थोडे तरी ओळखता येणे शक्य आहे. असा प्रयत्न आपल्या ऋषी मुनींनी केला. त्यांना जे ज्ञान प्राप्त झाले ते त्यांनी वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये मांडले.  आजही कित्तेक दुर्गम-निर्जन स्थळी असे महात्मे निश्चित असतील जे त्या असीम शक्तीच्या जवळ जाऊन तिला जाणण्याचा प्रयत्न करताहेत. आपण भौतिक सुखात एवढे गुरफटलोय कि अशी दिव्य शक्ती आपल्यात आहे, आपले असणे म्हणजेच तिचे असणे आहे, हेच स्वीकारत नाही. याचं एक कारण माणसा मधील वाढलेला अहंकार हे ही असेल. ‘मी’ चं अस्तित्व जास्त ग्राह्य धरल्यानं आज समाजात वरकरणी म्हणवणारी प्रगती आपण केली हा दावा आहे. पण त्यातही फारसं तथ्य नाहीच. कारण आपण नैसर्गिक संकटं अनुभवलीत हे संकेत आहेत त्या असीम शक्तीचे जी सावध करते मानवाला, की तुझा अहंकार व्यर्थ आहे. तू जे करतोयस ते मीच करू देतोय. अन्यथा तू निपचित पडून राहशील. मात्र, हे इशारे आपल्याला समजत नाहीत. अनेक विकल्प मनाशी कवटाळत आपण त्याच्यावर शंका घेतो आणि जो या विश्वाचा कर्ता, जो म्हणजेच विश्व हे नाकारून त्याला वेगळे काढण्याचा प्रयत्न करतो. इथंच तर माणूस फसतो. इथं आठवतो तो ‘ईशोपनिषत्’ मधील शांती मंत्र -

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पुर्णमुदच्यते
 पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥
 ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः |

    ते पूर्ण आहे, हे पूर्ण आहे. पूर्णापासून पूर्ण उत्पन्न होते. पूर्णाचे पूर्ण काढून घेतल्यानंतरही पूर्णच शिल्लक राहते. याचे संदर्भ स्पष्ट करताना डॉ. प वि वर्तकांची मांडणी अशी – “पूर्णातून पूर्ण बाहेर काढले तर पूर्णच शिल्लक राहणार. ब्रह्माही पूर्ण आहे आणि आत्माही पूर्णच आहे. तेव्हा शिल्लक जे काय राहिल ते ही पूर्णच असेल. ब्रह्म पूर्ण आहे, सर्व व्यापक आहे, अमर्याद आहे, त्यातून कोणतीही वस्तू बाहेर काढणे शक्य नाही आणि जे बाहेर काढाल किंवा बाहेर काढणारेही त्या ब्रह्मातच राहणार आहेत. मग कशातून बाहेर काढून काय बाहेर ठेवणार आणि कुठे ठेवणार सर्वच तर त्याने व्यापलेले त्याचेच आहे.” म्हणजेच त्या असीम शक्तीच्या हाती सर्वच एकवटलेले आहे. ना तो वेगळा ना आपण वेगळे ना विश्वातील कोणतीच वस्तू वेगळी. मग हा व्यर्थ अहंकार कशासाठी ? का त्याला शरण जाण्यात एवढा कमीपणा बाळगतो. कोणत्या कर्माच्या एवढ्या राशी निर्माण करून गाठोडे जड करतोय जे अंतिमत: पलिकडच्या दालनात जाताना अडचण निर्माण करेल. त्यामुळे शरणांत होऊऩ सर्व त्याच्या स्वाधीन करून अमृताची फळं चाखणं जास्त हितकारक नव्हे काय!

Posted by sumedha upadhye at 02:55 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Thursday, 13 April 2017

जनशक्तिमधील स्तंभ-
      3 – मन वढाय वढाय...
                         ...हवी मनाची मशागत
खोटी प्रतिष्ठा, पुरूषी अहंकार आणि असुरक्षितता अशा विविध कारणाने आज समाजात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. आजही पुरोगामी महाराष्ट्रात आंतरजातीय विवाह मान्य नाही, त्यातून राग इतका वाढतो की बापच मुलीची हत्या करतो. लागोपाठ मुलगीच जन्माला आली तर जन्मल्यानंतर किंवा गर्भातच नाजूक कळ्या चुरगळून टाकतो, एखाद्या मुलीने नकार दिला की लगेच पुरूषी अहंकाराला ठेच पोहचते आणि त्या मुलीवर बलात्कार तरी होतो किंवा तिच्यावर जीव घेणे हल्ले होतात. दुस-याचा जीव घेणे शक्य झाले नाही तर मग स्वत: आत्महत्येचा मार्ग स्वीकारायचा... या सर्वांच्या मागे हिंसक प्रवृत्ती आणि असुरक्षितता कार्यरत असते...हे सर्व कोणत्या मानसिकतेतून येतंय ? यामागे नेमके काय घडतेय की माणसंच माणसाच्या जीवावर उठताहेत? हे सर्व प्रश्न अनाकलनिय असले तरीही याची उत्तरं माणसांच्या मनातला कोलाहल हेच असावं. आज पर्यंत घरातून आणि समाजातून झालेले संस्कार आणि त्यातून पुढे आलेल्या अपेक्षा तर कधी अतिमहत्वकांक्षा यांचा परिणाम होऊन आपण मानवी हक्कच पायदळी तुडवत चाललोय.

 अशा घटना घडतात त्यांना प्रवृत्त करते ते म्हणजे माणसाचे कमकुवत मन. आपण शिक्षण घेतोय, सुशिक्षित म्हणवतोय, विविध क्षेत्रात प्रगती करतोय. पण आता तपासून पाहिलं पाहिजे की खरंच आपण सुशिक्षित होतोय म्हणजे नेमके काय? केवळ पुस्तकी पाठांतराने पदव्या मिळवल्या म्हणजे सुशिक्षित का? आपण सुसंस्कारीत होणे महत्त्वाचे आहे. ज्या अभ्यासाने, ज्या संस्काराने मनाची मशागत होईल ते शिक्षण आवश्यक आहे. अहंकार, प्रतिष्ठा यांच्या ओझ्याखाली आपण दुस-याचे सुंदर जीवन उध्वस्त करीत आहोत. याचे भान ठेवावे लागेल. जिथे शिक्षणाचा अभाव आहे, तिथंही असाच संताप तुमच्या सद्सद् विवेकाचाच गळा घोटत असतो. इथं त्या व्यक्तिचे कृत्य आणि त्याचा अंतरात्मा यांच्यातही द्वंद्वंच निर्माण होतं. कारण राग शांत झाला की लक्षात येतं आपल्या हातून अनर्थ घडला आहे.
कित्येकदा अंतर्मनाचा आवाज हा नेहमीच सत्य सांगत असतो ते प्रारब्ध असेल किंवा देव म्हणा आणि त्याचं न ऐकता जेव्हा कृती होते तेव्हा अहित निश्चित असतं. आत्मा सुंदर आहे, त्याला तर परमात्म्यात विलिन व्हायची आस असते, पण त्याचं न ऐकता मानवी मन बाह्य जगात स्वत:ला काहि तरी करून सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो ते जेव्हा साध्य होत नाही तेव्हा त्याचे कमकुवत मन अविचाराच्या आहारी जाते आणि मग त्यांच्या हातून मानवी संस्कृतिला काळीमा फासणारी घटना घडून जाते. माणसाच्या प्रत्येक कृत्यात मन अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतं. मन जेव्हा उदास होतं आणि जेव्हा ते नकारात्मक विचारांचीच उजळणी करू लागतं तेव्हा त्याचा पगडा इतका मोठा असतो की ते आपल्या बुद्धिचाही ताबा घेतं. मना पुढे बुद्धिने शस्त्र खाली टाकली की त्यातून जे कृत्य घडतं त्यात स्वत:चं, दुस-याचं आणि कधी कधी व्यापक प्रमाणात समाजाचंही अहित होतं. या सर्वात वाईट कुणीच नाही, तर परिस्थिती वाईट असते असं म्हटलं जातं. वर्षानुवर्ष मनावर जे संस्कार झाले आहेत, ते जोपर्यंत पुसले जात नाहीत. तसंच मानसिक आरोग्याचा प्रश्न व्यापकपणे चर्चेत येत नाही, तोपर्यंत त्यावर सुसंस्कार करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरतील. सशक्त मनाच्या हातून कधीही विघातक कृत्य घडू शकत नाही. आपल्याकडे मनाची मशागत करण्यासंदर्भात वेदकाळापासून कित्येक गोष्टी सांगितलेल्या आहे. मनाला संस्कारांचा लगाम घातला तर ते सैरवैर धावणे सोडून देते. मन स्थिर करण्यासाठी योग साधना प्रभावी आहे. प्राणायामाचं मह्त्त्व तर जागोजागी स्पष्ट केलेलं आहे. मात्र, आपल्याकडे आपल्या संस्कृतितल्या कित्येक चांगल्या व्यापक हिताच्या गोष्टी नाकारण्याची फॅशन आहे, ती दूर सारून घर, शाळा आणि समाज यात मनाच्या मशागतीवर भर दिला तर कित्येक सामाजिक प्रश्न सहज सोडवणं शक्य आहे. त्यातून असुरक्षिततेची भावना नष्ट होईल, सत्याच्या जवळ जाण्याची सवय होईल, मनामनात मानवतेचा विचार अंकुरेल आणि सर्वांचेच जीवन सुंदर होईल.
Posted by sumedha upadhye at 08:08 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Wednesday, 29 March 2017



दैनिक जनशक्ती या वृत्तपत्रात आजपासून दर बुधवारी 
'मन वढाय वढाय...' हा माझ्या स्तंभ सुरू झाला आहे, जरूर वाचा आणि कृपया आपल्या प्रतिक्रिया कळवा. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.

माणसातील माणुसकी म्हणजेच अध्यात्म

-    
सुमेधा उपाध्ये

     
समाजाचेच एक अविभाज्य अंग म्हणजे अध्यात्म असं म्हटलं तर नक्कीच अतिशयोक्ती ठरणार नाही. त्याचं कारण म्हणजे माणसांच्या समुहाचा समाज बनतो तर त्या समुहातील विविध व्यक्तिरेखा या आपापल्या संस्कारांची शिदोरी घेऊनच वावरत असते. व्यक्तीच्या हालचाली म्हणा किंवा त्यांची कर्म म्हणा ही त्यांच्यावरील संस्कारातून होत असतात. हे संस्कार समाजाकडून होतात,घरातून होतात, याचवेळी ज्याच्या संपर्कात सतत येतो त्याचा वाण नाही पण गुण अंगी येतोच. त्यामुळे समाजापासून ना राजकारण वेगळं, ना अर्थकारण वेगळं, ना अध्यात्म वेगळं. एका समाजाचेच हे सर्व रंग. मात्र, मध्यंतरीच्या काळात अध्यात्माचा बागुलबुवा उभा करण्यात आला. शब्द पांडित्य वाढलं आणि सर्वसामान्य माणसं यापासून दुरावली. तसंच पैसा हे केंद्रबिंदू मानून सहज कष्ट न करता वेगवेगळ्या धर्माच्या नावाचा टिळा लावून म्हणायला संन्यासी पण प्रत्यक्षात पैसा मिळवण्याचा उद्देश ठेवून त्यांनी भाबड्या, देवभोळ्या मंडळींवर जाळं टाकलं आणि त्यात अडकवण्याचा प्रयत्न सुरू केला. समाजातही एक वर्ग होताच ज्याला कष्टाविना एका रात्रीत
श्रीमंतीचा राजमार्ग हवा होता,  गुप्तधनाचे प्रलोभन... यास अनेकजण बळी पडले, यामुळे कोणताही संबंध नसताना गालबोट लागले ते अध्यात्मालाच.  जीवन साधेपणाने, सरळसोपे कसे जगता येईल आणि जे माझे आहे, ते दुस-याचेही आहे, त्याचाही हक्क आहे, याची जाणीव करून देणारं, माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणारं अध्यात्म बाजूला पडलं.  जसा कॉम्प्यूटरमध्ये वायरस शिरतो तसाच या धार्मिक संस्कारातही शिरलाच. उगाचच नको तेवढं बोजडपण वाढवलं गेलं, नको तेवढं बाजारीकरण झालं, त्यामुळं समाज यापासून दूर गेला. मोठाले पांडित्य मांडणा-या ग्रंथांवर धुळ चढत गेली आणि आमच्या डोक्यातील जळमट वाढत गेली.
        जीवनात सर्वच अनुभव आपण स्वत:घेऊन शिकायचं म्हटलं  तर एक जन्म कमीच पडणार. त्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागेल. म्हणूनच काही अनुभव पुस्तकातून घ्यावेत, काही दुस-याचं पाहून  शिकावं आणि आपल्याला स्वत:ला जगण्याच्या धडपडीत काही बरे बाईट अनुभव येत असतातच. या महाराष्ट्राच्या भूमीत अध्यात्मिक अनुभवांचं गाठोडं खच्चून भरलेलं आहे. या मातीतल्या संत मंडळींनी जे भरभरून ज्ञान दिलंय, जी शिकवण दिलीय तिला तोड नाही. सामान्यातल्या समान्यजनांचं जगणं सुलभ करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.देव माणसात शोधण्यास त्यांनी सांगितलं. मात्र, मध्यंतरीच्या भेसळीतूनच भेदाभेद आपण शुद्रबुद्धीने केले. स्वत:च्या रोजी रोटीचा विचार वाढला, स्वार्थ बळावला आणि देवातही फुट पाडून त्यांना वाटून घेतलं आणि सुरू झाली तीदुकानदारी... हे चित्र केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादीत नाही, अवघ्या हिंदुस्तानात आहे. पूर्व ते पश्चिम आणि उत्तर ते दक्षिण सर्वत्र अनुभव सारखेच. मात्र, अध्यात्मातील दाखले कोणत्याही धर्मातील ग्रंथांमध्ये, पुस्तकांमध्ये किंवा संतांच्या शिकवणुकीत पाहिले तर एक समान धागाच दिसतो. यापैकी कोणीही एकमेकांचा द्वेष करण्यास सांगितलेलं नाही. एक धर्म वाढवण्यासाठी दुसरा धर्म बुडवण्याची शिकवण दिलेली नाही. जे काही सद्या समाजात विष दिसतंय ते आपल्यातीलच काहींच्या स्वार्थी कुबुद्धीच्या मंथनातून निर्माण झालेलं आहे. समुद्र मंथनातून विष आणि अमृत हे दोन्ही बाहेर आलं, पण तेव्हा विष पचवणारा भोलेनाथ होता. आता हे विष पचवणारा कुणीच नाही म्हणून ते विष पाझरतंय ते जिथं खोलवर पाझरलं जाईल तिथं तिथं विनाश, संहार, अत्याचार, होतो ही भावना. यावर जालीम उपाय काय तर माणसातील सदसद् विवेक बुद्दी जागृत होणं महत्त्वाचं, त्यासाठी  सात्विक विचार आत अगदी तळापर्यंत रूजवणं महत्त्वाचं. आपण एखादी कृती विचारपूर्वक करतो...
या सदरा अंतर्गत आपण आता भेटत राहणारच आहोत, भारतातील अनेक स्थळ आहेत, जी आजही आपले दिव्यत्त्व राखून आहेत, अनेक अद्भूत अनुभव तिथं जाणवतात. अनेक महात्मे आहेत, जे हजारो वर्षांच्या परंपरेचं जतन आणि संवर्धन करताहेत, मानव कल्याण हाच त्यांचा हेतू आहे. आजही माणुसकीचा ओलावा शिल्लक आहे, अत्यंत हलाखिच्या स्थितीत स्वत: राहूनही आपल्या ताटतल्या अर्ध्या भाकरीतून पाव तुकडा भाकरी दुस-याला देताहेत. ठिकठिकाणी माणसातला माणूस जागृत करणारे साक्षात्कार होतात आणि तेव्हाच या भारत देशाचं वैविध्य आणि सांस्कृतिक अध्यात्मिक वैभव काय आहे याची जाणीव होते. गरज आहे ती केवळ व्यस्त जीवनातील काही काळ त्यांच्यात वावरण्याची!
Posted by sumedha upadhye at 04:11 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Friday, 10 March 2017

जीवनातली सुंदरता जागवूया...



...वाट पाहण्यात एक गम्मत आहे... वेगवेगळे पदर वाट पाहण्याचे असतात...त्यात काव्यही स्फुरतं...भेगाळल्या मातीत तृणपाती लवलवताना भासतात...पण हळूहळू वाट पाहणं हेच प्रारब्ध असल्याचं जाणवत ... गम्मत दूर दूर पळू लागते... दाट धुक्याचं भय वाटतं...काळोखाच्या वावटळीत नजर भेदरते ...खोल खोल दरीत जीव हेलकावत जातो... पहात रहायचं मग टोकावर... स्थितप्रज्ञ होऊन गटांगळ्याच्या गटांगळ्या...तुक्याचं विचारचक्र थांबलं... क्षीण आवाजातले..." श्रीराम जय राम जय जय राम ... "  शब्द हळू हळू जवळ येऊ लागले ...पायवाटंनं मसनवटीकडं दहा बाराजण जात होते...धोंड्याची तिरडी तशी हलकीच होती...

... 
शेतातला औत तसाच सोडून तुक्या मातीत फतकल मारून बसला होता...डोक्यावर सूर्य तळपत होता आणि घामाच्या धारा शेत शिंपत होत्या...तुक्याच्या डोक्यात मात्र भलतंच काव्य फेर धरत होतं...आशा निराशेच्या खेळातील सोंगटी होऊन जगण्याची आस झडत होती... तिरीमिरीत उठला आणि बांधावरच्या पांगिराला औताच्या दोरीचाच फास आवळला...

   गेली कित्तेक वर्ष राज्यात हेच सुरू आहे, आत्महत्यांनी हैदोस मांडलाय त्यांच्या जाळ्यात किमान 18 ते 45 वयोगटातील तरूणाई अडकलीय. तरूणाईचे जीवन असे अर्ध्यावर संपणं किंवा ते संपवावं असं तीव्रतेनं वाटणं हे कोणत्याही राज्याच्या वा देशाच्या प्रगतीला मारकच आहे. विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचं लोण आता राज्यात अन्य भागातही पसरू लागलं, यात मराठवाडाही आता अस्पृश्य राहिलेला नाही. या आत्महत्येस प्रवृत्त करणारे यम पाश इतके मजबूत झालेयत कारण सततची नापिकी, ओला किंवा सुका दुष्काळ तर कधी व्यसनाधीनता, लग्नासाठीचा डामडौल परवडत नाही तरीही करणे या सर्वातून सावकारी कर्जाचा पाश वाढत जातोय...प्रत्येकाच्या मरणाची कथा वेगवेगळी असली तरीही एक धागा समान, तो म्हणजे हा जीवच नकोसा होणे. त्यातून आत्महत्या हाच एकमेव पर्याय आहे, हा विचार बळावणं. काहीजणांना आशा असते सरकारी मदत आलीच तर मागे राहिलेल्यांचे चार दिवस तरी सुखाचे जातील...जन्माला आल्यानंतर किमान गरजा तरी पूर्ण व्हाव्यात ही आस प्रत्येकाची असतेच. त्यात कमी अधिक झालेलं समजू शकतं... मात्र, एक दाणा घरात येत नाही, राबराब राबूनही सर्व कष्ट वांझ ठरतात तेव्हा काय करावं? सरकार दरबारी होणारी नोंद ही नेमकी कशी केली जाते हाही संशोधनाचा विषय असू शकतो...  आणि त्यानंतर येणारी गंगाजळी गावातल्या घरात पोहचेपर्यंत त्याला किती आणि कुठे कुठे गळती लागली हे ही तपासणं जरूरीचं नव्हे काय....वेगवेगळ्या सामाजिक संस्था असतील, सरकारी उपक्रम असतील प्रत्येकाचा हेतू आत्महत्या रोखणे हा आहे. सरकारने ‘प्रेरणा प्रकल्प ‘ सुरू केला, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचा-यांना, स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिलं, जिल्हास्तरावरील तज्ज्ञांकडून समुपदेशन देणे सुरू आहे, मानसोपचार तज्ज्ञ, परिचारिका या सर्वांनी अगदी थेट घराघरात जाऊन पिचलेल्या शेतक-यांना आत्महत्येपासून रोखण्याचा प्रयत्न केला. जे शेतक-यांसाठी कार्य करीत आहेत ते वाखाणण्याजोगे आहे, पण त्यांचे हात आणखी मजबूत करण्याची गरज आहे. त्यांनाही सुविधा हव्यात, खेड्यात जाण्यास नकार देणारे डॉक्टर आजही संख्येने जास्त आहेत, त्यांनाही तिथे जाण्याची प्रेरणा देणे आवश्यक आहे.
     हे सर्व विविध पातळीवर होत असलं तरीही अनेकदा केवळ वरवरची मलमपट्टी अधिक होते आणि मूळ प्रश्नच बाजूला राहतो असं कायम दिसत आलंय. अलिकडे कित्येक गावातल्या शेती ओस पडताहेत, मात्र, शहराचा रस्ता धरला तरीही मिळणारी रक्कम दोन वेळचे जेवण देईल पण अन्य गरजांचे काय? एके काळचा शेतीप्रधान देश, अभिमान वाटावा असाच होता. 1966-67 ला भारतात हरितक्रांतीचे वारे घुमले, पीक पद्दतीत बदल , कमी पाण्यावरील रासायनिक शेतीलाही प्राधान्य दिले पण नंतर काय???  त्यानंतर काय हा मोठा प्रश्न प्रत्येक क्रांती नंतर उरतोच, त्याचे उत्तर शोधेपर्यंत अनेक जीव आपण गमावलेले असतात.
    आता पुन्हा बदलत्या हवामानाचा अंदाज घेऊन शेतक-यांची मानसिकता बदलणेही आवश्यक आहे. पारंपरिक पीक पध्दती बदलणं आणि शेतीच्या सोबत काही जोडधंदे देणे हा उपक्रम आता तुरळक का असेना पण होतोय. हे प्रयोग आता वाढवले पाहिजेत.  केवळ मदतीचे पैसे फेकून ही नसानसात भिनलेली जगण्याची भीती नष्ट होणार नाही. आम्ही तुमच्या सोबत आहोत हा दिलासा कृतीतून द्यावा लागेल. आपल्या प्रमाणेच समोरच्याचा जीवही मह्त्वाचा मानून त्याचा हात हाती घ्यावा लागेल, मायेचा ओलावा झिरपावा लागेल...आत्मविश्वास जागवावा लागेल. मनाची मशागत करून त्याला उभारी देणं आवश्यक आहे. त्यातून डोळ्यातील वाट पहाणे थांबेल... आणि जीवन सुंदर आहे हा विश्वास वाढेल. मग कुणा धोंड्याची वाट वेळे आधी स्मशाणाकडे जाणार नाही की कुणा तुक्याला पांगिराला फास आवळण्याची गरज भासणार नाही, एवढी आशा ठेवूया.
     


Posted by sumedha upadhye at 04:29 9 comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Tuesday, 7 March 2017

...मुक्त म्हणजे काय?

 “ती बाईक चालवते,”
 “व्वा… छानच की, बरं पुढे...?”
“  पाडव्याच्या मिरवणुकीत चालवते गाडी, तिला ढोल वाजवता येतो, ढोल वाजवत मिरवणुकीत सुंदर नाचते, आहे एकदम बिनधास्त आहे...  “
“  अच्छा... राव, आणखी काय करते ती    “
“ आणखी काय म्हणजे- पैसे कमावते, ऑफिसला जाते, नोकरीला आहे, दररोज,काय काय वेगवेगळ करते... सुंदर दिसते पाश्चात्य कपड्यांमध्ये    “
माझा पुढचा प्रश्न- “ लग्न झालंय का?  “

“हा मग झालंय की, दोन मुलं आहेत, संसार करतेय, सुरळीची वडी सुद्धा झाकचं करते...आस्वादवाल्यापेक्षा मस्तच, बाईंच्यात धमक आहे,  बिनधास्त, स्वतंत्र विचारांची...”
समाजात फिरताना स्त्रीचे असे कौतुक अनेकदा ऐकायला मिळते आणि त्या प्रत्येक वेळी मी विचारांमध्ये गढून जाते...हे सर्व म्हणजेच ‘स्त्री’ मुक्ती का? हे ऐवढेच त्या चळवळीचे फलित मानायचे का?
       स्त्री मुक्ती चळवळीची वाटचाल आता चाळीस एक वर्षांची झाली, संपूर्ण जगात स्त्रियांच्या मुक्तीसाठी चळवळ उभी राहिली, प्रचंड विरोधात ही चळवळ पाय रोवत गेली आणि फोफावली. अनेक कायदे बदलले, स्त्रियांना दिलासा देणा-या अनेक गोष्टी घडल्या...स्त्री मुक्तपणे थोडातरी श्वास घेऊ लागली. स्त्रियांच्या बाजूचे कायदे आले ते या संघटनांच्या दबावामुळे, पीडित महिला आज पोलिसात जाऊ लागल्या, न्याय मागू लागल्यात, अत्याचाराच्या विरोधातील आवाज वाढू लागलाय. हे संघटनांना उभारी देणारे निश्चितच आहे. पण ज्या ज्या वेळी समाजात वावरताना वरील संवाद ऐकते तेव्हा मन विषण्ण होते. या पलिकडे काही आहे आणि त्यासाठी स्त्री आज उभी राहताना दिसत नाही ही सल अनेक संघटनांची आहेच.
    “ स्त्रियांचे स्वातंत्र म्हणजे नक्की काय?   “  अत्यंत सरळ सोपा प्रश्न पण मनात ठिय्या मारून बसलाय.
बाह्य पेहराव किंवा पुरूषांची मक्तेदारी असलेल्या सर्व क्षेत्रातला उल्लेखनीय शिरकाव, ऐवढाच स्त्री स्वातंत्र्यांचा अर्थ मर्यादित नक्कीच नाही. यापेक्षा खूप सखोल काही आहे, आणि तेच अजूनही समाज मनात रूजलेले नाही. यात स्त्री-पुरूष दोघेही आलेच. स्त्रीच्या स्वातंत्र्यात पुरूषांच स्थान आहेच. कारण प्रत्येक हुंकार पुरूषाच्या आदेशाने घेणारी स्त्री स्वत:ला शोधू पाहतेय त्याचे पडसाद पुरूष मनावरही उमटत राहणार आहेत...
      आजही किती घरांमध्ये स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य आहे? किती महिलांना मुल जन्माला घालण्यासंदर्भातील मत मांडता येते? ज्याचे पोषण या स्त्रीच्या रक्तावर होणार तिथे तरी ती स्वत: मत मांडते का? मी केवळ मत मांडण्याचे विचारतेय. ते ग्राह्य धरून स्वीकारणे ही फार पुढची पायरी आहे. किती महिलांचा सहभाग घरातल्या प्रत्येक निर्णयात असतो, मग तो घरातील सजावट असो, स्वैयंपाक असो  ( कारण तिला आवडते म्हणून काही तिथे शिजवले जाईल ही शक्यताही कमीच), किती महिलांचा सेविंगमध्ये किंवा मुलांना कोणत्या शाळेत घालावे, एकत्र कुटुंबातील निर्णय प्रक्रिया असो वा रोजच्या छोट्या छोट्या ते अगदी दूरगामी परीणाम करणा-या निर्णय प्रक्रियेत सहभाग किती असतो. आता हे दोन्ही बाजूने म्हणता येईल. त्यांना सहभागी किती करून घेतले जाते हा एक भाग आणि दुसरा भाग किती स्त्रियांना स्वत:लाही या जबाबदा-या घेऊन पेलण्याची इच्छा आतून आहे ? की त्यांनाही केवळ बाह्य वेषांतरामध्ये आणि दुपारच्या किटी पार्टीत नव-याच्या पैशांचीच उधळपट्टी करायची असते. त्यांनाही मला काही कळत नाही, असं म्हणून जवाबदारी झटकायचीय, सतत पुरूषांवर अवलंबून रहायचेय. म्हणजे स्वातंत्र्य हवे ते कसेही वागण्याचे पण जवाबदारी घ्यायची नाही, तिथे स्त्रित्त्वाच्या उबदार शालीत पडून सुरक्षीत असल्याचे मानत राहण्यात आनंद आहे. असे विचार मनात येतात तेव्हा अनेकदा ज्या व्यापक प्रमाणात स्त्रिवादी चळवळीला यश यायला हवे होते ते का आलेले दिसत नाही, या प्रश्नाच्या उत्तराकडेही जाता येते.
     मुळात या स्त्री स्वातंत्र्यावर आजही आवाजच उठत राहिलाय कारण ‘स्त्री’च्या विचारांमध्येही फारसा बदल झाला नाही. वैचारीक गुलामगिरीतून ती स्वत: ही बाहेर येण्यास ध़डपडत नाही, असे चित्र अनेकदा दिसते. मेकअप हा वर वरचा असतो तो अंतरंगात सुंदरता आणू शकत नाही.  आम्ही नेमके तेच केले बाह्यांगावर संस्कार करत राहिलो आणि अंतरंगाची मशागत करायलाच विसरलो. त्यामुळे जिच्या विचारात आमुलाग्र बदल झालाय, जी समाजात आत्मविश्वासाने निर्णय घेते, मत पटवून देते, ठाम राहते, ती स्त्री खरी मुक्त...मग भलेही तिचे बाह्य स्वरूप कोणतेही असेल जे तिला सहजतेने वावरण्यास मदत करणारे असेल तसा पोषाख असेल पण ती विचारांनी मुक्त आहे, आमच्या खेड्यातल्या आदिवासी पाड्यावरची जास्वंदी यात मला अधिक भावते,- ती स्वत: शेतीत राबते, चिल्लापिल्लांना आंबिल भरवते आणि नवरा संध्याकाळी मोहाची पावशेर पोटात रिचवून आला, तमाशा करून तिला मारू लागला तर ती चुलीतले जळते लाकूड त्याच्या डोस्क्यावर आपडते, तो गुमान झोपडीत कडेला पडतो. अशा सर्व  परिस्थितीत एकटी लढत राहणे हे या महिलांकडून शिकावे असेही वाटतं, कारण एक जास्वंदीच नव्हे तर अशा अनेक जास्वंदी इथे पहायला मिळतात, आर्थिक परिस्थितीने त्या पिचलेल्या असतील पण स्वत:च्या मनगटावर संसाराचा गाडा ओढून आपला आत्मसन्मान कसा राखायचा हे यांना जास्त उमजलेय असे दिसते, जे शहरी महिलांमध्ये अभावाने आढळते. म्हणूनच आत्मसन्मान चेतवणा-या अशा स्वतंत्र स्त्रियांना त्रिवार मानाचा मुजरा !!!

-          - सुमेधा उपाध्ये 
Posted by sumedha upadhye at 19:11 7 comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Newer Posts Home
Subscribe to: Comments (Atom)

About Me

sumedha upadhye
View my complete profile

Blog Archive

  • ►  2023 (1)
    • ►  November (1)
  • ►  2018 (2)
    • ►  January (2)
  • ▼  2017 (7)
    • ▼  December (2)
      • घडलो’बि’घडलो-२
      • घडलो’बि’घडलो-१
    • ►  April (2)
      • मन वढाय वढाय-4 जनशक्तीमधील स्तंभ-                ...
    • ►  March (3)
      • दैनिक जनशक्ती या वृत्तपत्रात आजपासून दर ब...
      • जीवनातली सुंदरता जागवूया...
      • ...मुक्त म्हणजे काय?
Simple theme. Theme images by luoman. Powered by Blogger.