...हवी मनाची मशागत
खोटी प्रतिष्ठा, पुरूषी अहंकार आणि असुरक्षितता अशा विविध कारणाने आज समाजात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. आजही पुरोगामी महाराष्ट्रात आंतरजातीय विवाह मान्य नाही, त्यातून राग इतका वाढतो की बापच मुलीची हत्या करतो. लागोपाठ मुलगीच जन्माला आली तर जन्मल्यानंतर किंवा गर्भातच नाजूक कळ्या चुरगळून टाकतो, एखाद्या मुलीने नकार दिला की लगेच पुरूषी अहंकाराला ठेच पोहचते आणि त्या मुलीवर बलात्कार तरी होतो किंवा तिच्यावर जीव घेणे हल्ले होतात. दुस-याचा जीव घेणे शक्य झाले नाही तर मग स्वत: आत्महत्येचा मार्ग स्वीकारायचा... या सर्वांच्या मागे हिंसक प्रवृत्ती आणि असुरक्षितता कार्यरत असते...हे सर्व कोणत्या मानसिकतेतून येतंय ? यामागे नेमके काय घडतेय की माणसंच माणसाच्या जीवावर उठताहेत? हे सर्व प्रश्न अनाकलनिय असले तरीही याची उत्तरं माणसांच्या मनातला कोलाहल हेच असावं. आज पर्यंत घरातून आणि समाजातून झालेले संस्कार आणि त्यातून पुढे आलेल्या अपेक्षा तर कधी अतिमहत्वकांक्षा यांचा परिणाम होऊन आपण मानवी हक्कच पायदळी तुडवत चाललोय.

अशा घटना घडतात त्यांना प्रवृत्त करते ते म्हणजे माणसाचे कमकुवत मन. आपण शिक्षण घेतोय, सुशिक्षित म्हणवतोय, विविध क्षेत्रात प्रगती करतोय. पण आता तपासून पाहिलं पाहिजे की खरंच आपण सुशिक्षित होतोय म्हणजे नेमके काय? केवळ पुस्तकी पाठांतराने पदव्या मिळवल्या म्हणजे सुशिक्षित का? आपण सुसंस्कारीत होणे महत्त्वाचे आहे. ज्या अभ्यासाने, ज्या संस्काराने मनाची मशागत होईल ते शिक्षण आवश्यक आहे. अहंकार, प्रतिष्ठा यांच्या ओझ्याखाली आपण दुस-याचे सुंदर जीवन उध्वस्त करीत आहोत. याचे भान ठेवावे लागेल. जिथे शिक्षणाचा अभाव आहे, तिथंही असाच संताप तुमच्या सद्सद् विवेकाचाच गळा घोटत असतो. इथं त्या व्यक्तिचे कृत्य आणि त्याचा अंतरात्मा यांच्यातही द्वंद्वंच निर्माण होतं. कारण राग शांत झाला की लक्षात येतं आपल्या हातून अनर्थ घडला आहे.
कित्येकदा अंतर्मनाचा आवाज हा नेहमीच सत्य सांगत असतो ते प्रारब्ध असेल किंवा देव म्हणा आणि त्याचं न ऐकता जेव्हा कृती होते तेव्हा अहित निश्चित असतं. आत्मा सुंदर आहे, त्याला तर परमात्म्यात विलिन व्हायची आस असते, पण त्याचं न ऐकता मानवी मन बाह्य जगात स्वत:ला काहि तरी करून सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो ते जेव्हा साध्य होत नाही तेव्हा त्याचे कमकुवत मन अविचाराच्या आहारी जाते आणि मग त्यांच्या हातून मानवी संस्कृतिला काळीमा फासणारी घटना घडून जाते. माणसाच्या प्रत्येक कृत्यात मन अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतं. मन जेव्हा उदास होतं आणि जेव्हा ते नकारात्मक विचारांचीच उजळणी करू लागतं तेव्हा त्याचा पगडा इतका मोठा असतो की ते आपल्या बुद्धिचाही ताबा घेतं. मना पुढे बुद्धिने शस्त्र खाली टाकली की त्यातून जे कृत्य घडतं त्यात स्वत:चं, दुस-याचं आणि कधी कधी व्यापक प्रमाणात समाजाचंही अहित होतं. या सर्वात वाईट कुणीच नाही, तर परिस्थिती वाईट असते असं म्हटलं जातं. वर्षानुवर्ष मनावर जे संस्कार झाले आहेत, ते जोपर्यंत पुसले जात नाहीत. तसंच मानसिक आरोग्याचा प्रश्न व्यापकपणे चर्चेत येत नाही, तोपर्यंत त्यावर सुसंस्कार करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरतील. सशक्त मनाच्या हातून कधीही विघातक कृत्य घडू शकत नाही. आपल्याकडे मनाची मशागत करण्यासंदर्भात वेदकाळापासून कित्येक गोष्टी सांगितलेल्या आहे. मनाला संस्कारांचा लगाम घातला तर ते सैरवैर धावणे सोडून देते. मन स्थिर करण्यासाठी योग साधना प्रभावी आहे. प्राणायामाचं मह्त्त्व तर जागोजागी स्पष्ट केलेलं आहे. मात्र, आपल्याकडे आपल्या संस्कृतितल्या कित्येक चांगल्या व्यापक हिताच्या गोष्टी नाकारण्याची फॅशन आहे, ती दूर सारून घर, शाळा आणि समाज यात मनाच्या मशागतीवर भर दिला तर कित्येक सामाजिक प्रश्न सहज सोडवणं शक्य आहे. त्यातून असुरक्षिततेची भावना नष्ट होईल, सत्याच्या जवळ जाण्याची सवय होईल, मनामनात मानवतेचा विचार अंकुरेल आणि सर्वांचेच जीवन सुंदर होईल.
No comments:
Post a Comment