Wednesday, 3 January 2018

घडलो’बि’घडलो-4


चर्चगेट स्टेशनला उतरले, सकाळचे साडे दहा झाले होते. आकाशवाणीला जायचं तर अकराची वेळ होती. किमान अर्धा तास आधीच आले, आता कुठं जावं या विचारतच इराण्याच्या हॉटेलकडं नकळत पावलं वळली होती. इथला बन मस्का आणि ग्लास भर चहा मारला की नंतर जेवण मिळालं तर ठिक नाही तरी ठिक. किमान दोन वाजेपर्यंत तरी निश्चिंती पुढे बघू. वेटरला हाक मारली, खांद्यावरचं कळकट्ट फडकं हातात घेऊन हात पुसत पुसत आला. “बन-मस्का और चाय देना.” तो आज्ञाधारकपणे गेला तेवढ्यात पाण्याचा ग्लास ओतप्रोत भरून उपकार केल्याच्या नजरेनं पहात बाल कामगार पुढे सरकला. कितीही कायदे करा आपल्या देशात त्याचा उपयोग नाही. हे चिमुरडे हात ध़डे गिरवण्यात मग्न हवेत, पण प्रत्यक्षात काय तर इथं भरताहेत पाण्याचे घडे... मला आठवतंय मुंबईत आले तेव्हा सावन्या म्हणाला होता,”ताई मी पण येतो तुमच्या संग, तुम्हाला पन मदत नि मला बी मुंबई बघायची हाय.” तशी मी ओरडलेच त्याला, मुकाट्यानं गावातल्या शाळेत जा, अभ्यास कर आणि मोठा झालास की ठरवू काय करायचं ते. यालाही असंच कुणी तरी आणलं असेल का? लहान मुलांना मुंबईचं वेड भारी अर्थात लहानांनाच का मोठ्यांनाही असतंच की... याच विचारात बनमस्का आणि चहा संपला. गल्ल्यावर पैसे दिले आणि निघाले. अजून 15 मिनिट हातात होती. सरळ चालतच निघाले. आकाशवाणीसाठी एक नाट्य लिहिलं होतं. तेवढं दिलं की काम पूर्ण होणार होतं. सीमा खेडकर तशी मदत करणारीच. कधी भेटली की लगेच विचारायची काय लिहिलंय का काही नवीन. आयुष्याच्या वळणावर कोण कधी, कसं भेटेल आणि भरभरून देऊन जाईल याचा नेम नाही. प्राक्तनातल्या सा-या घटना घडतात, त्या कशा घडवून आणायच्या हे त्या विधात्याला माहित असतं. योग्य वेळी योग्य़ व्यक्ती आपसूक आपल्या समोर येते, आपलं कार्य होऊन जातं, कसं घडलं? याला उत्तर नसतं. निमित्तच सारं असतं बाकी काही नाही. विचारचक्रातच आकाशवाणीच्या गेटवर पोहचले. रिसेप्शनवर नाव नोंदवलं. सीमाची भेट झाली, ठरल्या वेळे पेक्षा आधिच स्क्रिप्ट दिल्यानं मॅडमच्या चेह-य़ावर आनंद फुलला होता. दहा मिनिटं केबिनमध्ये बसवल. लगेच येते म्हणाली...आता अर्धातास होऊन गेला. समोरच काही अन्य स्क्रिप्ट्स पडल्या होत्या त्या चाळल्या... मग कंटाळले, उठून बाहेर पडणार तोच सीमा धापा टाकत आली. अग मेधा आज आली नाही, मग काय तिचे स्क्रिप्ट वाचायचे होते तेही वाचलं आणि माझंही वाचलं. आता फ्री चल चहा घेऊ... नको आत्ताच घेतलाय . परत केव्हा तरी घेऊ. त्याच वेळी सीमानं एक नंबर दिला आणि या निशा बोराडे मॅडम आहेत, यांना भेट त्यांच्या स्त्री विषयक मासिकासाठी काही काम आहे म्हणत होत्या. “अगं, केवळ स्त्रियांच्या प्रश्नांवर फारसं लिहीलं नाही. तसा अनुभव नसताना कसं लिहिणार?” जाऊन भेट निघेल मार्ग. सीमा प्रचंड आशावादी, सतत कामात गुंतलेली. कधी एका जागी स्थिरपणं बसलेलं तिला पाहिलेलंच नाही. सतत माणसांच्या गर्दीत रमणारी आणि दुस-यांना मदत करणारी. तिला दुखावणं शक्य नव्हतं, सद्या हातात काही कामही नव्हतं. म्हणून पत्ता घेतला, नवीन प्रशासकीय इमारत 11 वा मजला. पत्ता म्हणजे एवढंच होतं. अर्थात गेली काही वर्ष या चर्चगेट परिसरात बरीच पायपीट केलेली होती त्यामुळं महत्त्वाच्या इमारती आणि कार्यालयं ओळखीची झाली होती. खिशाला टॅक्सी परवडणारी नव्हतीच. सीमाचा निरोप घेतला बाहेर पडले. मोबाईलही नव्हताच त्यामुळं माझं आणि सीमाचं ठरलेलं होतं. रात्री लँड लाईनला एक फोन करायचा. म्हणजे संपर्कात राहिलो की कामं असेल तर पुन्हा सकाळी चर्चगेट गाठणं सोईचं होतं. तिथून चालत चालंत, बोराडे बाई कशा असतील याचा विचार करतच निघाले. इमारतीच्या आत गेले. लिफ्टसाठी रांग होतीच. मुंबई आणि रांग हे जणू समीकरणच आहे. चार लिफ्ट असूनही रांग भली मोठी. एकदा मनात आलं जिन्यावरून जाऊया का? पण अकरा मजले होते. एरवी गेले असते पण आज पहिल्यांदाच त्या बाईंना भेटाय़चं होतं, मग घाम पुसत समोर बसणं योग्य दिसणारं नव्हतंच. देव संयमाची परीक्षा कुठेही पाहू शकतो हा ही विचार मनात तरळून गेला आणि हसूच आलं. इतक्यात लिफ्ट आली समोर धावले अकरावा मजला म्हणाले, तर लिफ्टमन किंचाळलाच- ही अकरावर थांबत नाही, बाजूच्या लिफ्टने जा. आता परत रांग लावणं शक्य नव्हतं म्हणून त्याला म्हटलं, मग कितीवर थांबणार? आठ आणि पंधरा. म्हटलं ठिक आहे, पंधरावर चला. माझ्यासाठी उतरणं सोपं होतं. त्याची सवयही होती. आयुष्यात चढ फार कमी आले आणि चढण्या आधीच उतरावं लागलेले प्रसंग अधिकच होते. म्हणून असेल म्हणा मी पंधाराचा पर्याय घेत उतरणं पसंत केलं....पण या उताराने काही फार वाईट घडलं नाही, माणूस यातूनच अनुभव घेतो शिकत जातो. आईची वाक्य डोक्यात घुमली – “परिस्थितीनं आलेलं शहाणपण जास्त महत्त्वाचं असंतं.”आज सकाळीसुध्दा तिची तीव्र आठवण आली होती. परलोकात फोन करण्याची सोय असती तर किती मज्जा आली असती. रोज किमान बोलता तरी आलं असंतं. आईचं सारं जीवन कष्टातच गेलं. ती नेहमी म्हणायची दोन हजार कमावलेस तरी चालेल पण नोकरी कर, ती कधी सोडू नकोस आणि मी तिचा हाच सल्ला धुडकावला होता. वरिष्ठांच्या बोलण्याचा राग डोक्यात गेला आणि तडका फडकी राजीनामा दिला. परिणामी ही वणवण माझ्याच मागं लागली, ना वरिष्ठांना याची झळ बसली ना कार्यालयाला. शैक्षणिक संस्थांचं फुटलेलं पेव, यामुळं दरवर्षी कारखान्यातून शिक्षितांची फौज बाहेर पडतेय. गुणवत्ता काय करायचीय? सरावानं जमतं सारं. आजही समाजात पुरूषी अहंकार कमी झालेला नाही. जमेल तिथं संधी मिळेल तिथं बाईचा सन्मान ठेचण्यात, त्यांना आनंदच मिळत असतो. कानावर कडक पण चिरका आवाज ओतला गेला... पंधराsssमी भानावर आले बाहेर पडले. जीने उतरून खाली आले, तिथं चौकशी केली निशा बोराडे मॅडम कुठे बसतात. शिपायाने समोरच्या टेबलाकडे बोट केलं. कॉटनची ऑफ व्हाईट आणि सोनेरी किनार असलेली टिपिकल साऊथची साडी, कपाळावर ठसठशीत मोठी टिकली. भुवया रेखीव कोरलेल्या, डोळ्याच्या क़डा सोडून पसरलेलं काजळ, डार्क महरून कलरची लिपस्टीक... एकूण त्यांच्याकडे पाहून प्रथम दर्शनी या बाई स्त्री मासिकाच्या सर्वेसर्वा असतील अशी शक्यता वाटत नाही. टेबला जवळ गेले. “नमस्कार ! सीमाने पाठवलेय. “ हो हो तिचा फोन आला होता. बसा ना.” जरा दडपण आलं होतं. तशीच खुर्चीवर टेकले. बाईंनी चहा पाणी मागवलं आणि नंतर विषयाला हात घातला- “ आमच्याकडं देणगी रूपानं जे धन जमतं त्यावर मासिक काढतो, या मासिकावर संपादक म्हणून माझंच नाव असेल. मला वेळ नाही म्हणून तुम्ही लेख जमा करणं आणि संपादित करून प्रिंटिंगला पाठवणं, वेळेत प्रिंट होतंय का ते पहायचं आणि मग बाकीची कामं करण्यास इतर सहकारी आहेतच”. स्त्रियांवर होणारे अत्याचार आणि त्यांच्या वेदनांना वाट मोकळी करून देणं हा आपला उद्देश. नवनवीन लिहिते हात बघा म्हणजे मानधनाचा प्रश्न येत नाही. नवोदितांना प्रसिध्दी हवी असते. “ बाईंच्या प्रत्येक बोलण्यातून आत्मविश्वास झळकत होता. प्रत्येक वाक्य नव्याने काही तरी शिकवत होतं आणि त्यांचा खरा रंग मेकपअपच्या आडून बाहेर दिसू लागला... ओठांचा काळा रंग लपण्यासाठी जसा डार्क लिपस्टिकचा वापर केला असावा अगदी तसाच. त्यांच्याबद्दलचं पहिलं मत बदलत होतं. चहा कसातरी ढकलला आणि निरोप घेतला. बाई इतक्या घायकुतीला की उद्याच निर्णय कळवा हा आग्रह होता. होय म्हटलं आणि बाहेर पडणार तोच... मगाचचा शिपाई धावत आला- मॅडम, आपण अनिता कुळकर्णी का?” ”होय, आपण कसं ओळखलंत? मी तर इथं प्रथमच येत आहे.” दिवाळी अंकातली आपली ‘वाड्याची कहाणी’ ही गोष्ट वाचली होती आणि त्यावरचा आपला फोटोही पाहिला होता. कुणी आपल्याला ओळखत आहे, तेही लेखनामुळं...ही भावना फारच सुखावून जाणारी असंते, रणरणत्या उन्हात अचानक वटवृक्षाची सावली मिळावी अगदी तसं झालं- “अहो, पण त्यास आता बरेच महिने झाले, या वर्षीची दिवाळी तोंडावर आली आहे.” होय मॅडम पण त्यातल्या अनेक घटनांचे साधर्म्य आमच्या मॅडममध्ये असल्यानं तुम्ही लक्षात राहिलात. “ मी त्याला धन्यवाद दिले आणि पुढे जाणार तसा तो पुन्हा आला. “ मॅडम, एक विचारू का?” मी खुणेनंच त्याला संमती दिली आणि त्याने सांगायला सुरवात केली,त्याच्याकडून जे ऐकत होते त्यावर विश्वास बसत नव्हता. तुला कसे माहित रे, अहो मी घरी जातो कामासाठी त्यांचे साहेब पण या बाजूच्या डिपार्टमेंटला आहेत. माणसाचे चेहरे आम्हाला पण वाचता येतातच की... मी काहीही न बोलता लिफ्टची वाट न पाहता खाली उतरत होते. एवढी मोठी अधिकारी आणि एका स्त्री मासिकाची संपादिका पण आपल्या नव-याचा बेलगामपणा झुगारू शकत नाही. दोघेही उच्च विद्याविभूषित आणि तरीही नशेतल्या नव-याची दररोज दंडेली सहन करते? पुरूषी अहंकाराचे आसूड पाठीवर घेत ही बाई पुन्हा कार्यालयीन कामं उरकून उर्वरीत वेळात करारी मुद्रेनं स्त्री मुक्तीच्या कार्यात वावरते. स्वत: वरचा अन्याय दूर करू शकत नाही, ती दुस-यास काय न्याय मिळवून देत असणार? सारंच भंपक आहे का? पण दुसऱ्या क्षणी मन हळवं झालं. कदाचित जे घरात करता येत नाही ते समाजात करून अन्य एखाद्या स्त्रीला मदत झाली तर तेवढीच पुण्याई हा उदात्त हेतू असू शकतो... आपण माणसं ओळखतो या अहंकाराला छेद देणारी ही घटना अनुभवली होती... बाई ही तुझी कहाणी किती जन्माची गं, अन्यायाच्या बेड्यांनी पाय तुझं बांधलं गं...या ओळी फेर धरू लागल्या.
या पुरूषी अहंकारातून तिची कधी सुटका होणार? किती जन्म त्यासाठी झिजणार हे त्या विधात्यास ठावूक...आता मात्र, तिरस्काराची जागा सहानुभूतीने घेतली, दुस-या दिवसाची वाट न पाहता रात्रीच फोन करून मी उद्यापासून काम सुरू करतेय असा निरोप दिला. तिच्या वेदना कमी करू शकत नाही पण सहवासातून नक्कीच तिच्यासह अन्य स्त्रियांनाही समजून घेता येईल, तेवढाच एक दिलासा!
- सुमेधा उपाध्ये

No comments:

Post a Comment