Wednesday, 3 January 2018

घडलो’बि’घडलो- 3


रोहन आज युएससाठी उडणार होता, त्याच्या पंखात आलेलं बळ त्याला इथं स्वस्थ बसू देत नव्हतं. पगाराच्या आकड्या पेक्षा तिथं आपण नवनवीन खूप काही शिकू असा त्याचा विश्वास होता. खरं तर फक्त दहा वर्ष तिकडे राहून पुन्हा भारतातच स्थायिक व्हायचं हे त्यानं बारावीत असतानाच स्पष्ट सांगितलं होतं. तेव्हा ते फारसं मनावर घेण्यासारखं नाही असं वाटलं होतं. पण आज त्याचे शब्द त्याने खरे केले होते. भारतातला एक स्काॅलर सॉफ्टवेअर इंजीनिअर
आता युएसच्या एका विख्यात कंपनीत कार्यरत होणार होता. अनेक प्रश्न मनात फेर धरत होते. एवढा शिकलाय तर त्याचा उपयोग भारतातच व्हायला हवा वगैरे... देशप्रेमाची आठवण करून दिली. पण त्याच्या स्पष्ट विचारांनी अनामिकेतील आईला हरवलं आणि सामानाची बांधाबांध होऊन आज जाण्याचा दिवस उजाडला होता. रोहन मुलगा असूनही तिला त्याचं बाहेर जाणं त्रासाचं ठरत होतं, हे आईचं प्रेम होतं, मन भविष्याच्या भितीनं ग्रस्त होतं का...न टिकणारा विरोध का केला? अनेक प्रश्न निर्माण झाले तसेच जिरले होते. बाबाचं लेकाला प्रोत्साहन होतं, घे भरारी मोठा हो आणि ये परत आम्ही वाट पहात आहोत... त्याला एअरपोर्टवर सोडायला दोघेही गेले...ठरल्या वेळी तो आत गेला ठरल्या वेळी फ्लाईट उडालं...तसं अनामिकाच्या पोटात आलेल्या गोळ्यानं एक कळ निर्माण केलीच...
अनामिका एक कर्तबगार स्त्री, तिनं तिच्या क्षेत्रात घेतलेली भरारी लक्षणीय होती. एका शेतक-याची मुलगी गावातून बाहेर पडली आणि शहरातल्या झगमगाटात न हरवता नेटानं उच्च शिक्षण पूर्ण केलं. “जग पहायचं असेल तर शिक्षण घ्यावेच लागेल आणि शिकायचं असेल तर घर सोडणं भाग आहे...हे सत्य त्या काळात अनामिकानं पचवलं होतं. कोणत्याही कष्टांना सामोरं जाण्याची तयारी ठेवूनच तिनं घरा बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. तालुक्याच्या ठिकाणी फक्त एक महाविद्यालय होतं. तिथं जाण्यासाठी कोणतंही वाहन सकाळच्या वेळात तिच्या गावातून जात नव्हतं. तेव्हा आईला हा निर्णय मान्य होता कारण मुलीनं शिकावं आणि स्वत:च्या पायावर उभं रहावं ही तिचीच जास्त आकांक्षा होती. बापाचा जीव मात्र पोरीत गुंतला होता. पण तिच्या भविष्या आड येणं त्याच्याही तत्वात बसत नव्हतं. अखेर अनामिकाचं घर सुटलं, सुरूवातीला स्नेहींच्या घरी राहण्याचा अनुभव ती घेत होती, नंतर मात्र हॉस्टेलमध्ये जागा मिळाली. यात एक चांगलं घडलं ते म्हणजे फार कमी वयात घर सोडल्यानं बाहेरच्या जगाशी संपर्क लवकर आला, त्यातून जीवनानुभव ती घेत होती. शहरातल्या झगमगाटात ती हरवणार नाही, वाहवत जाणार नाही ही खात्री तिच्या घरी दोघांना होती. घर सोडताना बाबांनी दिलासा दिला- विचार करण्या इतपत शिक्षण झालंय. चांगलं वाईट दोन्हीचे परिणाम माहित आहेत. प्रत्येक वळणाला जो निर्णय घ्याल तो मान्य असेल, मात्र मान खाली जाईल, असं काही करणार नाही हा विश्वास कायम ठेवा. दुस-यांकडून काही आम्हाला कळण्या आधी तू आम्हाला सांगत जा, आम्ही सोबत आहोत...खूप मोठे व्हा! आज शिखरावरून खाली उतरत असताना हे सर्व आठवलं आणि जाणवलं, कळत नकळत झालेल्या संस्कारांमध्येच भविष्यातील वाटचालीची बीजं रोवली जात असतात. घरातून मिळणारं स्वातंत्र्य, मुलीवर असलेला दृढ विश्वास आणि आपण सोबत आहोत याची खात्री हे सर्व ज्यांच्या नशिबात येतं त्यांचा भविष्यकाळ एका वेगळ्याच उंचीवर निश्चित जातो. घरातील आधार माणसाला समाजात दोन हात करण्याचं बळ देतं. एक मुलगी म्हणून आपण त्यांना घरातच कशी वागणूक देतो हे फार महत्वाचं ठरतं. समाजाच्या खोट्या बागुलबुवाला बळी पडणा-यांची संख्या आजही या समाजात आहे. लोकं काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील या विचारातच आयुष्य सरत जातं आणि उमलणा-या कळ्या फुलण्या आधीच कुणाच्या तरी हवाली केल्या जातात.
घरातून सतत मुलांवर नजर ठेवत असू प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष तर त्या मुलांचा आत्मविश्वास वाढत नाही किंवा संधी मिळताच लाईफ असंच एन्जॉय करायचं असतं या खुळ्या कल्पनेतून ती वाईट संगतीच्या आहारी कधी जातात हे कळत नाही. मुलांच्या जडणघडणीत जेवढा वाटा समाजाचा आहे, त्याहून अधिक घरातील वातावरणाचा आहे. सुरूवाती पासूनच त्यांना मोकळं वातावरण दिलं, त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न केला, विश्वास दिला तर ती घडाघडा आपल्याशी बोलतात. त्यांनाही खूप काही सांगायचं असंतं, किशोर वयात खूप प्रश्न पडतात. मला वाटतं मुलं लहान असताना त्यांना आईची गरज असते त्याहून कित्तेक पटीने ती गरज ते किशोर वयात येतात तेव्हा असते. अनेक प्रश्न मनात रेंगाळत असतात ते जाणून त्यांना योग्य उत्तरं दिली तर त्यांची उत्सुकता कमी होते, समाधान झालं की उत्तरं शोधण्यास ती बाहेर जात नाहीत. घरातल्या मशागतीनं मन परिपक्व झालेलं असेल तर बाहेरच्या संगतींचा त्यांच्यावर फारसा परिणाम होत नाही. असे सर्व संस्कार नकळत घरातूनच अनामिकेवर झाले होते. तिच शिदोरी तिनं रोहनला दिली होती. एवढा विश्वास नक्की होता की तो भरकटणार नाही. आपण खेड्यातून शहरात आलो, तो शहरातून परदेशात गेला. आपल्या पोरानं आपलीच तर ‘री’ ओढलीय हे मनोमन पटल्यावर, तिच्या चेहऱ्यावर समाधान झळकलं...ती उठली, तिचा आवडता आलं घातलेला स्ट्रॉंग चहा केला. बाल्कनित बसलेल्या सुमितच्या हाती एक मग टेकवत हसून म्हणाली पिल्लू उडालं मिस्टर, त्याच्या विश्वाच्या शोधात, चला पुन्हा आपला राजा राणीचा संसार फुलवूया...चिअर्स!
-सुमेधा उपाध्ये

No comments:

Post a Comment