Tuesday, 7 March 2017

...मुक्त म्हणजे काय?

 “ती बाईक चालवते,
 व्वा छानच की, बरं पुढे...?”
 पाडव्याच्या मिरवणुकीत चालवते गाडी, तिला ढोल वाजवता येतो, ढोल वाजवत मिरवणुकीत सुंदर नाचते, आहे एकदम बिनधास्त आहे...  “
“  अच्छा... राव, आणखी काय करते ती    “
आणखी काय म्हणजे- पैसे कमावते, ऑफिसला जाते, नोकरीला आहे, दररोज,काय काय वेगवेगळ करते... सुंदर दिसते पाश्चात्य कपड्यांमध्ये    “
माझा पुढचा प्रश्न- लग्न झालंय का?  “

हा मग झालंय की, दोन मुलं आहेत, संसार करतेय, सुरळीची वडी सुद्धा झाकचं करते...आस्वादवाल्यापेक्षा मस्तच, बाईंच्यात धमक आहे,  बिनधास्त, स्वतंत्र विचारांची...
समाजात फिरताना स्त्रीचे असे कौतुक अनेकदा ऐकायला मिळते आणि त्या प्रत्येक वेळी मी विचारांमध्ये गढून जाते...हे सर्व म्हणजेच स्त्री मुक्ती का? हे ऐवढेच त्या चळवळीचे फलित मानायचे का?
       स्त्री मुक्ती चळवळीची वाटचाल आता चाळीस एक वर्षांची झाली, संपूर्ण जगात स्त्रियांच्या मुक्तीसाठी चळवळ उभी राहिली, प्रचंड विरोधात ही चळवळ पाय रोवत गेली आणि फोफावली. अनेक कायदे बदलले, स्त्रियांना दिलासा देणा-या अनेक गोष्टी घडल्या...स्त्री मुक्तपणे थोडातरी श्वास घेऊ लागली. स्त्रियांच्या बाजूचे कायदे आले ते या संघटनांच्या दबावामुळे, पीडित महिला आज पोलिसात जाऊ लागल्या, न्याय मागू लागल्यात, अत्याचाराच्या विरोधातील आवाज वाढू लागलाय. हे संघटनांना उभारी देणारे निश्चितच आहे. पण ज्या ज्या वेळी समाजात वावरताना वरील संवाद ऐकते तेव्हा मन विषण्ण होते. या पलिकडे काही आहे आणि त्यासाठी स्त्री आज उभी राहताना दिसत नाही ही सल अनेक संघटनांची आहेच.
    स्त्रियांचे स्वातंत्र म्हणजे नक्की काय?   “  अत्यंत सरळ सोपा प्रश्न पण मनात ठिय्या मारून बसलाय.
बाह्य पेहराव किंवा पुरूषांची मक्तेदारी असलेल्या सर्व क्षेत्रातला उल्लेखनीय शिरकाव, ऐवढाच स्त्री स्वातंत्र्यांचा अर्थ मर्यादित नक्कीच नाही. यापेक्षा खूप सखोल काही आहे, आणि तेच अजूनही समाज मनात रूजलेले नाही. यात स्त्री-पुरूष दोघेही आलेच. स्त्रीच्या स्वातंत्र्यात पुरूषांच स्थान आहेच. कारण प्रत्येक हुंकार पुरूषाच्या आदेशाने घेणारी स्त्री स्वत:ला शोधू पाहतेय त्याचे पडसाद पुरूष मनावरही उमटत राहणार आहेत...
      आजही किती घरांमध्ये स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य आहे? किती महिलांना मुल जन्माला घालण्यासंदर्भातील मत मांडता येते? ज्याचे पोषण या स्त्रीच्या रक्तावर होणार तिथे तरी ती स्वत: मत मांडते का? मी केवळ मत मांडण्याचे विचारतेय. ते ग्राह्य धरून स्वीकारणे ही फार पुढची पायरी आहे. किती महिलांचा सहभाग घरातल्या प्रत्येक निर्णयात असतो, मग तो घरातील सजावट असो, स्वैयंपाक असो  ( कारण तिला आवडते म्हणून काही तिथे शिजवले जाईल ही शक्यताही कमीच), किती महिलांचा सेविंगमध्ये किंवा मुलांना कोणत्या शाळेत घालावे, एकत्र कुटुंबातील निर्णय प्रक्रिया असो वा रोजच्या छोट्या छोट्या ते अगदी दूरगामी परीणाम करणा-या निर्णय प्रक्रियेत सहभाग किती असतो. आता हे दोन्ही बाजूने म्हणता येईल. त्यांना सहभागी किती करून घेतले जाते हा एक भाग आणि दुसरा भाग किती स्त्रियांना स्वत:लाही या जबाबदा-या घेऊन पेलण्याची इच्छा आतून आहे ? की त्यांनाही केवळ बाह्य वेषांतरामध्ये आणि दुपारच्या किटी पार्टीत नव-याच्या पैशांचीच उधळपट्टी करायची असते. त्यांनाही मला काही कळत नाही, असं म्हणून जवाबदारी झटकायचीय, सतत पुरूषांवर अवलंबून रहायचेय. म्हणजे स्वातंत्र्य हवे ते कसेही वागण्याचे पण जवाबदारी घ्यायची नाही, तिथे स्त्रित्त्वाच्या उबदार शालीत पडून सुरक्षीत असल्याचे मानत राहण्यात आनंद आहे. असे विचार मनात येतात तेव्हा अनेकदा ज्या व्यापक प्रमाणात स्त्रिवादी चळवळीला यश यायला हवे होते ते का आलेले दिसत नाही, या प्रश्नाच्या उत्तराकडेही जाता येते.
     मुळात या स्त्री स्वातंत्र्यावर आजही आवाजच उठत राहिलाय कारण स्त्रीच्या विचारांमध्येही फारसा बदल झाला नाही. वैचारीक गुलामगिरीतून ती स्वत: ही बाहेर येण्यास ध़डपडत नाही, असे चित्र अनेकदा दिसते. मेकअप हा वर वरचा असतो तो अंतरंगात सुंदरता आणू शकत नाही.  आम्ही नेमके तेच केले बाह्यांगावर संस्कार करत राहिलो आणि अंतरंगाची मशागत करायलाच विसरलो. त्यामुळे जिच्या विचारात आमुलाग्र बदल झालाय, जी समाजात आत्मविश्वासाने निर्णय घेते, मत पटवून देते, ठाम राहते, ती स्त्री खरी मुक्त...मग भलेही तिचे बाह्य स्वरूप कोणतेही असेल जे तिला सहजतेने वावरण्यास मदत करणारे असेल तसा पोषाख असेल पण ती विचारांनी मुक्त आहे, आमच्या खेड्यातल्या आदिवासी पाड्यावरची जास्वंदी यात मला अधिक भावते,- ती स्वत: शेतीत राबते, चिल्लापिल्लांना आंबिल भरवते आणि नवरा संध्याकाळी मोहाची पावशेर पोटात रिचवून आला, तमाशा करून तिला मारू लागला तर ती चुलीतले जळते लाकूड त्याच्या डोस्क्यावर आपडते, तो गुमान झोपडीत कडेला पडतो. अशा सर्व  परिस्थितीत एकटी लढत राहणे हे या महिलांकडून शिकावे असेही वाटतं, कारण एक जास्वंदीच नव्हे तर अशा अनेक जास्वंदी इथे पहायला मिळतात, आर्थिक परिस्थितीने त्या पिचलेल्या असतील पण स्वत:च्या मनगटावर संसाराचा गाडा ओढून आपला आत्मसन्मान कसा राखायचा हे यांना जास्त उमजलेय असे दिसते, जे शहरी महिलांमध्ये अभावाने आढळते. म्हणूनच आत्मसन्मान चेतवणा-या अशा स्वतंत्र स्त्रियांना त्रिवार मानाचा मुजरा !!!

-          - सुमेधा उपाध्ये 

7 comments:

  1. Sunder Lekh. Mala thoda add karava vattay. Jababdari pelna ha stri swabhav ch aahe tyamule "jaswandi" durga houn jababdari pelte aahe.Pan tyahi pudhe jaun "i need a reason to smile each morning" asa mhanun swataha sathi jagna he ajun aplya samajat titkasa rujla nahi... "the heart calls" asa call gheun swataha sathi jagata ala pahije.

    ..... he just kahi pusta vachun zaleli uparati aahe..maza dnyan ani kshamata alpa aahe..tyamule kahi chukala aslyas kshama asavi..

    ReplyDelete
  2. धन्यवाद ! आपले मत समस्त महिलांची विचार करण्यास नक्कीच भाग पाडते. स्त्री स्वत:च्या आनंदाचा विचार कायम बाजूला सारते हे ही खरे आहे. अनेकदा ती स्वत:ची ओळख स्वत:च पुसते आणि नंतर स्वत:चाच चेहरा पुन्हा शोधते. वास्तव आहे!

    ReplyDelete
  3. Khup chhan lekh. Anek striya swatantrya ani hakk yasathi agrahi astat. Pan tyabarobar yenari jababdari pelnyachi tyanchi tayari naste.

    ReplyDelete