...वाट पाहण्यात एक गम्मत आहे... वेगवेगळे पदर
वाट पाहण्याचे असतात...त्यात काव्यही स्फुरतं...भेगाळल्या मातीत तृणपाती लवलवताना
भासतात...पण हळूहळू वाट पाहणं हेच प्रारब्ध असल्याचं जाणवत ... गम्मत दूर दूर पळू
लागते... दाट धुक्याचं भय वाटतं...काळोखाच्या वावटळीत नजर भेदरते ...खोल खोल
दरीत जीव हेलकावत जातो... पहात रहायचं मग टोकावर... स्थितप्रज्ञ होऊन
गटांगळ्याच्या गटांगळ्या...तुक्याचं विचारचक्र थांबलं... क्षीण आवाजातले..."
श्रीराम जय राम जय जय राम ... " शब्द हळू हळू जवळ येऊ लागले ...पायवाटंनं
मसनवटीकडं दहा बाराजण जात होते...धोंड्याची तिरडी तशी हलकीच होती...
... शेतातला औत तसाच सोडून तुक्या मातीत फतकल मारून बसला होता...डोक्यावर सूर्य तळपत होता आणि घामाच्या धारा शेत शिंपत होत्या...तुक्याच्या डोक्यात मात्र भलतंच काव्य फेर धरत होतं...आशा निराशेच्या खेळातील सोंगटी होऊन जगण्याची आस झडत होती... तिरीमिरीत उठला आणि बांधावरच्या पांगिराला औताच्या दोरीचाच फास आवळला...
गेली कित्तेक वर्ष राज्यात हेच सुरू आहे, आत्महत्यांनी
हैदोस मांडलाय त्यांच्या जाळ्यात किमान 18 ते 45 वयोगटातील तरूणाई अडकलीय. तरूणाईचे
जीवन असे अर्ध्यावर संपणं किंवा ते संपवावं असं तीव्रतेनं वाटणं हे कोणत्याही
राज्याच्या वा देशाच्या प्रगतीला मारकच आहे. विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचं लोण
आता राज्यात अन्य भागातही पसरू लागलं, यात मराठवाडाही आता
अस्पृश्य राहिलेला नाही. या आत्महत्येस प्रवृत्त करणारे यम पाश इतके मजबूत झालेयत
कारण सततची नापिकी, ओला किंवा सुका दुष्काळ तर कधी व्यसनाधीनता,
लग्नासाठीचा डामडौल परवडत नाही तरीही करणे या सर्वातून सावकारी
कर्जाचा पाश वाढत जातोय...प्रत्येकाच्या मरणाची कथा वेगवेगळी असली तरीही एक धागा
समान, तो म्हणजे हा जीवच नकोसा होणे. त्यातून आत्महत्या हाच
एकमेव पर्याय आहे, हा विचार बळावणं. काहीजणांना आशा असते
सरकारी मदत आलीच तर मागे राहिलेल्यांचे चार दिवस तरी सुखाचे जातील...जन्माला
आल्यानंतर किमान गरजा तरी पूर्ण व्हाव्यात ही आस प्रत्येकाची असतेच. त्यात कमी अधिक
झालेलं समजू शकतं... मात्र, एक दाणा घरात येत नाही, राबराब राबूनही सर्व कष्ट वांझ ठरतात तेव्हा काय करावं? सरकार
दरबारी होणारी नोंद ही नेमकी कशी केली जाते हाही संशोधनाचा विषय असू शकतो...
आणि त्यानंतर येणारी गंगाजळी गावातल्या घरात पोहचेपर्यंत त्याला किती आणि
कुठे कुठे गळती लागली हे ही तपासणं जरूरीचं नव्हे काय....वेगवेगळ्या सामाजिक
संस्था असतील, सरकारी उपक्रम असतील प्रत्येकाचा हेतू
आत्महत्या रोखणे हा आहे. सरकारने ‘प्रेरणा प्रकल्प ‘ सुरू
केला, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य
कर्मचा-यांना, स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांना
प्रशिक्षण दिलं, जिल्हास्तरावरील तज्ज्ञांकडून समुपदेशन देणे
सुरू आहे, मानसोपचार तज्ज्ञ, परिचारिका
या सर्वांनी अगदी थेट घराघरात जाऊन पिचलेल्या शेतक-यांना आत्महत्येपासून रोखण्याचा
प्रयत्न केला. जे शेतक-यांसाठी कार्य करीत आहेत ते वाखाणण्याजोगे आहे, पण त्यांचे हात आणखी मजबूत करण्याची गरज आहे. त्यांनाही सुविधा हव्यात,
खेड्यात जाण्यास नकार देणारे डॉक्टर आजही संख्येने जास्त आहेत,
त्यांनाही तिथे जाण्याची प्रेरणा देणे आवश्यक आहे.
हे सर्व विविध
पातळीवर होत असलं तरीही अनेकदा केवळ वरवरची मलमपट्टी अधिक होते आणि मूळ प्रश्नच
बाजूला राहतो असं कायम दिसत आलंय. अलिकडे कित्येक गावातल्या शेती ओस पडताहेत, मात्र,
शहराचा रस्ता धरला तरीही मिळणारी रक्कम दोन वेळचे जेवण देईल पण अन्य
गरजांचे काय? एके
काळचा शेतीप्रधान देश, अभिमान वाटावा असाच होता. 1966-67 ला
भारतात हरितक्रांतीचे वारे घुमले, पीक पद्दतीत बदल , कमी पाण्यावरील रासायनिक
शेतीलाही प्राधान्य दिले पण नंतर काय??? त्यानंतर काय
हा मोठा प्रश्न प्रत्येक क्रांती नंतर उरतोच, त्याचे उत्तर
शोधेपर्यंत अनेक जीव आपण गमावलेले असतात.
आता पुन्हा बदलत्या हवामानाचा अंदाज घेऊन शेतक-यांची मानसिकता
बदलणेही आवश्यक आहे. पारंपरिक पीक पध्दती बदलणं आणि शेतीच्या सोबत काही जोडधंदे
देणे हा उपक्रम आता तुरळक का असेना पण होतोय. हे प्रयोग आता वाढवले पाहिजेत. केवळ मदतीचे पैसे फेकून ही नसानसात भिनलेली
जगण्याची भीती नष्ट होणार नाही. आम्ही तुमच्या सोबत आहोत हा दिलासा कृतीतून द्यावा
लागेल. आपल्या प्रमाणेच समोरच्याचा जीवही मह्त्वाचा मानून त्याचा हात हाती घ्यावा
लागेल, मायेचा ओलावा झिरपावा लागेल...आत्मविश्वास जागवावा
लागेल. मनाची मशागत करून त्याला उभारी देणं आवश्यक आहे. त्यातून डोळ्यातील वाट
पहाणे थांबेल... आणि जीवन सुंदर आहे हा विश्वास वाढेल. मग कुणा धोंड्याची वाट वेळे
आधी स्मशाणाकडे जाणार नाही की कुणा तुक्याला पांगिराला फास आवळण्याची गरज भासणार
नाही, एवढी आशा ठेवूया.

जगाचा अन्नदाता संकटात आहे तुम्ही सर्व वास्तु factory मदे बनू शकता पण लक्षात ठेवा धन्य भाजी पला बनऊ शकत नहीं ना भविष्यात बनऊ शकल
ReplyDeleteजय जावन जय किसान
जगाचा अन्नदाता संकटात आहे तुम्ही सर्व वास्तु factory मदे बनू शकता पण लक्षात ठेवा धन्य भाजी पला बनऊ शकत नहीं ना भविष्यात बनऊ शकल
ReplyDeleteजय जावन जय किसान
धन्यवाद! आपणच त्यांच्या सोबत राहण्याची गरज आहे.
DeleteVery true. Kiman bhaji vikat ghetana ghasaghis thambvali payje. petrol,pizza ya goshti kiti hi mahag zalya tari apan enjoy karto pan kanda mahag zala ki lagech arda orda karto. Kiman te thambla payje.
ReplyDeleteSumedha Taie Khup sunder lekh..
धन्यवाद!
Deleteधन्यवाद!
ReplyDeleteसुनीलजी, आपल्या सारख्या संवेदनशील नागरिकांच्या पुढाकाराची आवश्यकता आहे.
ReplyDeleteKhup sundar tai.
ReplyDeleteAapan kuthe vichar karato pan aatta nakkI karu. Thanks. ...
thank you!
Delete