Monday, 11 December 2017

घडलो’बि’घडलो-२


किमान वर्षभरानं माहेरच्या मातीत पाय टेकवला होता. इकडे यावंस वाटत नाही असं नव्हे, पण कामाच्या व्यापात राहून जातं. अलिकडं फोनची सोय झाल्यानं प्रत्यक्ष भेट लांबली तरी बोलता येतं, एवढंच समाधान. म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवायची. 
बऱ्याच दिवसांनी आलो त्यामुळे मुलंही खूष होती. दुपार पर्यंत त्यांचा दंगा सुरूच होता, मात्र जेवणं झाली तशी कानाशी भूण भूण सुरू झाली, कंटाळा आला, आता काय करायचं. वेगवेगळे खेळ सुचवले पण यांचा कंटाळा कशातच विरघळेना, शेवटी दामटवून झोपवले. मात्र, साडेतीनलाच पुन्हा उठली. आता यांना गुंतवलेच पाहिजे म्हणून वहिनीला म्हटल,” भिलईला गाडी आत जाते का गं. “ वहिनी होय म्हणाली. मग ठरवलं तिकडेच जाऊया. कपिलेश्वराचं जुनं मंदिर आहे समोर मोकळं अंगण आहे. खेळतील आणि दमले की रात्री लवकर झोपतील. 
म्हणजे आम्ही सर्व मोठी मंडळी अंगणात निवांत गप्पा मारत बसू शकतो. 
तयारी करून निघालोच. वीस ते पंचवीस मिनिटांत पोहचलो. मंदिराचा कायापालट झाला होता. समोर छान सभामंडप होता. पाण्याची दोन कुंड बाधंलीयत, हातपाय धुऊन कपिलेश्वराच्या दर्शनासाठी मंदिरात गेलो.गाभाऱ्यातील जुनी शिवपिंडी आणि समोरचा नंदी मात्र  होतं तसंच आहे. शांतता तर अशी की सहज डोळे मिटले तरी ध्यान लागाव. काळ्याभोर पिंडीवर ताजी हिरवीगार बिल्वपत्र शोभून दिसत होती. गाभाऱ्यात खापराचा दिवा तेवत होता. बाहेर सभामंडपात लाईटची सोय केलेली आहे. पण गाभाऱ्यात या मिणमिणत्या दिव्याचं अखंड साम्राज्य! मुलं खेळण्यास पळाली होतीच. मंदिराच्या समोर छोटीसी नदी आहे. त्या पलिकडच्या किनाऱ्यावर स्मशानभूमी. बप्पा म्हणायचे हा शंम्भो संसारी माणसांना विसरू देत नाही, कितीही माझं माझं केलंत तरी शेवटी इथं एकट्यायालाच यायचंय.  म्हणून गावाच्या मध्यावरील मंदिरा समोरच स्मशानाला जागा... शेजारी असलेलं बप्पांच घर...बप्पा म्हणजे इथले पुजारी. बाप्पाचा अपभ्रंश बप्पा झालं असावं हा माझा तर्क. त्या घरात आजही  काही बदल नव्हताच. पूर्वी वारंवार यायचो त्यामुळे अनेकांशी ओळख होतीच. मुलं खेळण्यात रमली तशी मी आणि वहिनी बप्पांच्या घरी गेलो. त्यांच्या सुनेनं हसतमुखानं स्वागत केलं. ओसरीवर बसलो. तेवढ्यात शेजारचा विजय, म्हादू काका, सख्या, सुमन...एक ना अनेक . भेटायला आली, गप्पांचा फड रंगला. बप्पांची सून शुभांगी, तिलाही अवघा गाव वहिनीच म्हणतो. ती म्हणाली,एक दिवसाड तरी हे सर्व येणारच. सर्व काही तसंच सुरू आहे...बप्पा जाऊन सहा महिने झाले. तिनं डोळ्याला पदर लावला. सर्वांच्याच डोळ्यात पाणी तराळलं.
अशी कित्तेक मंडळी बप्पांनी हयातभर जपलेली. त्यांना चहा देणं रोजचंच. आमच्यासकट यांतील कुणीही आलं की चहा पिणार, हवापाण्याच्या गप्पा मारणार, काही अडचण असेल तर सल्ला मागणार, कुणाच्यात कुरबुरी असतील तर त्या दूर करणार, कुणी मदत मागितली तर देणार. शेतीचा बैल हवा दोनतीन दिवस, शेत नांगरायचंय  म्हणाला तरी देणार, कधी तिखट मिठ तर कधी काय...मागणाऱ्याला देत राहणार, संकोचानं न मागणाऱ्याच्या खांद्यावर हात टाकून आस्थेनं विचारपूस करणार, मग त्यालाही मदत...तर यातलेच काही जण अधूनमधून त्यांचा हात धरून त्यांना समोरच्या रस्त्यावर नेणार...बप्पांना हे सवयीचं होतं, मग लेंग्याच्या खिशात हात घालून ते त्यांच्या हातात काही टेकवून तेच मूठ वळायचे. ‘जा रे नीट जा...जास्त घेऊ नकोस.’ 
मग बप्पांची सावलीच असलेल्या राधाकाकू आतूनच ओरडणार... कशाला देता तो घेणार हातभट्टीची. पैसे वर आलेत का? आपलाही संसार आहे म्हटलं...त्यावर बप्पांच ठरलेलं वाक्य- “ माणूस आशेनं येतो, कुठे पंचपक्वान्न घालतोय, घोट भर चहा आणि पाच दहा रूपये. शम्भो देतोय आणि देईल. बप्पांना तासनतास पूजा करताना कधी पाहिलं नाही, मात्र मुखात सतत शम्भोचं नाव. त्यांची पाच मिनीटांत पूजा आटपायची. मात्र, माणसांवर प्रचंड प्रेम. माणसं जपली पाहिजेत, जिवंत माणसाच्या मुखी घाला हा जीवनमंत्र होता. मृत्यूनंतर लोकं गाव जेवण घालतात, काय उपयोग? माणूस जिवंत आहे तोवर त्याला सांभाळा, ही नकळत कृतीतून दिलेली शिकवण होती. राधाकाकू त्रागा करायची, पण तिच्याकडूनही दारात आलेला कधी रिकाम्या हाती गेलाच नाही...काही ना काही हातावर टेकवायचीच. पावसाळ्यात राधाक्काच्या हातचं लोणचं कित्तेक घरात पोहचायचं. भात लावायला शेतात येणारे मजूर भर पावसात उपाशी राहू नयेत म्हणून मागच्या ओसरीतल्या चुलीवर मोठ्या पातेल्यात भात रटरटायचा आणि कुळथाचं पिठलंही व्हायचं... 
तेव्हाही मंदिरातलं दर्शन आणि शेजारची हिरवाई आम्हाला आवडत होती, पण खरी ओढ होती बप्पांना भेटायची.  याच अंगणात बागडायचो. त्यांचे मदत करणारे हात पहायचो...मोठे झालो तसे प्रश्न पडायचे? हे सर्व कसं घडतं ? पैसे येतात कसे, कसं निभावतात हे सर्व...? “ पण हे कोडं उलगडलं तेव्हा गाव पार दूर सोडलं होतं, स्वत:चा संसार सुरू झाला, अनेक चढउताराच्या काळात बप्पांची आठवण सोबतीस यायची. 
पंचक्रोशी बप्पांचा शब्द मानायची ते त्यांच्या याच माणुसकीच्या धर्मामुळेच....शुभांगी वहिनी चहा घेऊन आल्या. बप्पांच्या आठवणी डोळ्यांसमोर फेर धरत होत्या, दोन महिन्याच्या अंतराने दोघेही गेले तेव्हा संपूर्ण गाव शेवटचा निरोप द्यायला लोटलेला...पुढे महिना भर आजूबाजूच्या गावातली माणसंही येतच होती....रडतही होती...माणसं हिच त्यांची श्रीमंती होती, एवढंच नव्हे तर श्वास होती...
आज आमची गाडी पाहिली  तशी ही ओळखीची जुनी मंडळी ओसरीवर आली...आस्थेनं विचारपूस केली. आता त्यांना आशा असते की नाही, माहीत नाही...पण -‘बेस रहा हौ...येतच रहा...’असं म्हणून हसत हसत निरोप घेऊन उठलेला म्हादूकाका चार पावलं पुढे गेला आणि मला बप्पांचे शब्द आठवले. मग म्हादू काका अशी हाक मारली पर्समधून  ५० रू. च काढले. कारण मला माहित आहे, आजही तो मोहाची किंवा काजूची हातभट्टीचीच घेणार आहे. तो ही सर्व जाणून हात पुढे करून तोंडाने नको नको म्हणत होता. पण डोळ्यातून कृतज्ञता वाहत होती...जुनी माणसं अशीच माणसं जोडत गेली. तेच पुढं सुरू राहिलं तर त्यातून आनंदच निर्माण होतो, हे मलाही अलिकडं पटलंय. अंधार वाढत होता , तसं दंगा करणाऱ्या मुलांना गाडीत घातलं. शुभांगी वहिनीचा साश्रू नयनांनी निरोप घेऊन बाहेर मुख्य रस्त्याला लागलो. सवयीनं गाडीचा ताबा इंद्रियांकडे  होता... मन मात्र भूतकाळातल्या सारीपाटावर रेंगाळलं होतं. 
- सुमेधा उपाध्ये

घडलो’बि’घडलो-१


 लहानपणी आम्ही सर्व भावंड आईसोबत कधी नातेवाईकांकडे तर कधी स्नेहींकडे जायचो. यातील अनेकजण आमच्या पेक्षा बऱ्यापैकी पैसे बाळगून होते, घरून निघतानाच आई सांगायची-“ बाळांनो, तिकडे कोणत्याही वस्तूला हात लावायचा नाही, काहीही मागायचं नाही, बदाम पिस्ते काजू हे सर्व खूप महाग असतं. ते सर्व पदार्थ सजवण्यासाठी वापरतात. पौष्टिकता तर आहेच...हं,  तर काय सांगतेय ऐकताय ना रे...! ती घराणं मोठी त्यांच्या मुलांनी हळूच ताटलीत हात घालून काही खाल्ले म्हणून तुम्ही हात घालाल, तसं करू नका. अरे, श्रीमंतांची गोष्ट वेगळी असते, त्यांनी काही खाल्लं तर आवडतं म्हणून खाल्लं असं म्हणतील, गरीबानं मात्र भूक लागली  म्हणून लपवून खाल्लं असं टोचत राहतील, नीट वागा हं.” आईची उदाहरणं, म्हणी लय भारी असायच्या, पण या संस्कारांमुळे घरा बाहेर कुठंही गेलो तर, पहिलं वाढलेलं तेवढंच खाण्याची सवयच जडली. कुणाकडेही कधीच न मागण्याच्या या सवयीमुळे त्याचे परिणाम जे व्हायचे ते होतातही. पण समाधान मोठं. 
मात्र, अशातही फक्त एक भूक कळत्या वयापासून कायम वाढत गेली, ती आवडीनं जोपासली, ती म्हणजे ज्ञानाची भूक. नवनवीन माहिती जाणून घ्यायची, प्रयत्न करायचे. कित्तेकदा त्यासाठी रद्दीतली पुस्तकं उचलून आणली, तर काहींची ओझीही वाहिली.दिवस पुढेपुढे सरकत गेले. 
काळ कुणासाठी थांबत नसतोच. आता घरोघरी एक किंवा दोन मुलं, त्यांच्या गरजा वेगवेगळ्या, अलिकडं मुलांचंही कुणाकडं जाणं येणं नाही.  ती आपल्या विश्वात जास्त रमतात. नाती असो वा स्नेही किंवा मैत्री सारंच कसं अलिकडं सोशल मिडियाच्या माध्यमतून जपलं जातं. घरात बदाम पिस्त्याच्या बरण्या ओसंडून वाहतात, ते संपवावे म्हणून त्याचे लाडू केले, तरी दोन दिवस बळेबळे खाल्ले जातात, मग आठच दिवसात ते घरा बाहेर पडतात...कधी कामकरणाऱ्या बाईच्या घरात, तर कधी कचरा घेऊन जाणाऱ्याच्या हातात...संदर्भ बदलले की नकळत होणाऱ्या संस्कारांचे मुल्यही बदलत जातं. आपण मात्र विचार करत राहतो...कमी पैशातही तेव्हा घरात सुख समाधान नांदत होतं, चेहऱ्यावर झळकत होतं. मागणं हे कमीपणाचं लक्षण होतं. आता संपूर्ण समाजाचीच जडण घडण बदलली. नात्यांचे बंध विरळ होत गेले अन् मागण्याचे संदर्भही बदलले!
- सुमेधा